|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहरातील 43 गणेशोत्सव मंडळांनी केले विसर्जन

शहरातील 43 गणेशोत्सव मंडळांनी केले विसर्जन 

प्रतिनिधी/ सातारा

बाप्पां दहा दिवसांच्या मुक्कामानंतर गावी जाणार आहेत. त्यांना निरोप देण्याची तयारी भक्तगणांनी केलेली आहे. उद्या सातारा शहरासह जिह्यात मानांच्या गणपतीसह 3 हजार 562 गणेशोत्सव मंडळांच्या श्रीचे विसर्जन होणार आहे. मिरवणुकांमध्ये डॉल्बी न वाजवण्याचे आदेश दिले आहेत. वेळेतच मिरवणुका काढण्याच्याही सूचना दिल्या आहेत. बुधवारी सायंकाळी सातारा शहरात 43 गणेशोत्सव मंडळांनी वाजतगाजत मिरवणुका काढून बाप्पांना निरोप दिला. दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरता सातारा पोलिसांनी सातारा शहरातून संचलन केले. पोलीस उपअधीक्षक समीर शेख यांनी बंदोबस्ताला असलेल्या कर्मचाऱयांना चिक्की आणि मास्कचे वाटप केले. पालिकेच्यावतीने कृत्रिम तळय़ावर मोठी क्रेन बसवण्यात आली आहे.

गेले दहा दिवस भक्तीपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा विराजमान होते. गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते त्यांच्या सेवेत लिन झाले होते. यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. सातारा शहरातील 43 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बुधवारी दुपारपासून विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. पारंपरिक वाद्याच्या तालावर मिरवणूक काढण्यात येत होत्या. रात्री उशिरापर्यंत बाप्पाच्या जयघोषात मिरवणुका सुरु होत्या. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. दरम्यान, पालिका प्रशासनाने मंगळवार तळय़ाजवळ विसर्जनाकरता ठेवण्यात आलेल्या कुंडय़ांबाबत गणेशभक्तांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या कुंडय़ात विसर्जन करण्यात आलेल्या मूर्ती तशाच उचलून उघडय़ा ट्रक्टरमधून नेल्या जातात. सातारा पालिकेने विसर्जन मिरवणुकीवरचे सर्व खड्डे बुजवले आहेत. मोठी क्रेन तळय़ावर बसवण्यात आली आहे. गुरुवार सातारा जिह्यातील साडेतीन हजार गणेशोत्सव मंडळ विसर्जन करणार आहे.

पालिका प्रशासन अलर्ट

सातारा पालिका प्रशासन गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने अलर्ट झाले आहे. महत्वाचा दिवस म्हणजे अनंत चतुदर्शीदिवशी मानाचा गणपती म्हणून पालिकेच्या गणपतींची पहिली मिरवणूक निघते. तसेच शेवटी मानाच्या गणपतीचे विसर्जन होते. तब्बल 18 ते 20 तासाचा कालावधी मिरवणुकीचा असतो. त्याकरता सातारा पालिकेच्यावतीने नेमण्यात आलेल्या सर्व टीम वेगवेगळय़ा ठिकाणी कार्यरत आहेत. अगदीच कृत्रिम तळय़ावरही पट्टीचे पोहणारेही तैनात ठेवले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणाही आहे. 

लोकमान्य आणि ‘तरुण भारत’च्यावतीने मंडळांचे स्वागत

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या वाजतगाजत निघणाऱया मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी व ‘तरुण भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडप उभारला आहे. तेथे मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत लोकमान्यच्यावतीने सुनील मोरे व ‘तरुण भारत’च्यावतीने दीपक प्रभावळकर हे करत होते. जायट्सं ग्रुपच्यावतीने या मंडपास भेट दिली.

Related posts: