|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फलटण-लोणंद मार्गावर धावली रेल्वे

फलटण-लोणंद मार्गावर धावली रेल्वे 

23 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी

प्रतिनिधी/ फलटण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रेल्वेमंत्री पियुष गोयल व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच फलटण रेल्वेचा तब्बल 23 वर्ष प्रलंबित्त असणारा प्रश्न अवघ्या 90 दिवसात मार्गी लागला अन् फलटण-लोणंद मार्गावर रेल्वे धावू लागली. माझ्या वडिलांनी फलटणच्या रेल्वेचे पाहिलेले स्वप्न अखेर साकार करण्यात मला यश आले. फलटणच्या रेल्वे रूळावरून रेल्वे जातानचा ऐतिहासिक क्षण पहाताना फलटण तालुक्यातील तमाम जनतेसह माझाही आनंद गगनात मावेनासा झाल्याने माझी ही छाती 56 इंच झाली असल्याचे भावुक उद्गार सोलापुर विभागीय रेल्वेमंडळाचे अध्यक्ष खासदार रणाजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काढले.

  फलटण-लोणंद रेल्वेचे उद्घाटन सोहळय़ापुर्वी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आयोजित सभेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर होते. यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते -पाटील, कृषीमंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर, उद्योजक हणमंत मोहिते, विश्वासराव भोसले, डॉ. जे. टी. पोळ, दिगंबर आगवणे, सुशांत निंबाळकर, बजरंग गावडे यांचे पुणे विभागीय रेल्वे मंडळाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 तालुक्यातील रेल्वेचा प्रश्न मिटल्याचा आनंद सर्वानाच झाला आहे. फलटणकरांनी त्याचा उपभोग आनंदानी घ्यावा हा सुवर्ण क्षण ज्यावेळी फलटणच्या रेल्वेचा इतिहास लिहला जाईल त्यावेळी या क्षणाचे आपण भागीदार आहोत अशी सर्वांना आठवण होईल. रेल्वेच्या व अन्य विकासाच्या कामांसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व घटकाचा मी मनापासुन आभार मानतो, असेही खा. रणजितसिंहांनी सांगितले.

  जयकुमार गोरे म्हणाले, वडिलांनी रेल्वेचा पाया रचला त्यावर मुलाने कळस रचला आहे. फलटणच्या नवीन पर्वाला आज खरी सुरूवात झाली. पाहिल्या तीन महिन्यात रणजितसिंहानी पाच वर्षाचे काम खासदारकीच्या माध्यमातून केले. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी एकेकाळी राष्ट्रवादीची गाडी सक्षमपणे सांभाळली. मात्र आज गाडीचा बंद दरवाजा मोकळा झाला त्यातुन अनेकजण बाहेर पडत आहेत. मी फलटणला येत होतो सभांमधुन  शिव्या घालत होतो आज त्याचा खासदारकीच्या रुपात परिणाम झाल्याचे दिसते. मी रामराजेंना शिव्या घातल्या नसत्या तर रणजितसिंह खासदार झाले नसते असे सांगत यापुढे तुम्हाला राजकीय त्रास देणाऱयांचे उच्चाटन होणार आहे. तालुक्याला लागलेला कलंक पुसला जाणार आहे, अशी टिका गोरे यांनी रामराजेंचे नांव घेवुन केली.

    यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी फलटण- पंढरपुर रेल्वेचे काम सुरू करावे अशी मागणी केली. कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचेही भाषण झाले. प्रारंभी मंडल रेल्वेप्रबंधक मिलींद देउस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्तविक भाषणात म्हणाले, लोणंद -फलटण -बारामती असा 64 कि.मी. चा प्रस्तावित रेल्वे मार्ग होता. पैकी लोणंद -फलटणपर्यंतच्या 26 कि मी चे काम झाले आहे. या मार्गावर चार स्टेशन आहेत, ओव्हर ब्रीज अंडरब्रीज आहेत या सर्व कामांसाठी 278 कोटी रूपये खर्च झाले आहेत. प्रति तास 50 किंमी वेग वाढविला आहे. फलटण -बारामती रेल्वे मार्गाचे काम रखडले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 आभार रेल्वे जनरल मॅनेजर मिश्रा यांनी मानले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन रेल्वेचा शुभारंभ केला. कार्यक्रमास शहर व तालुक्यातील नागरिक, विविध संस्थाचे पदाधिकारी, रेल्वे प्रशासन अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related posts: