|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भगदाड पडलेल्या ‘क्लेरी फ्लोक्युलेटर’ टाकीची तज्ञाकडून पाहणी

भगदाड पडलेल्या ‘क्लेरी फ्लोक्युलेटर’ टाकीची तज्ञाकडून पाहणी 

प्रतिनिधी /सांगे :

शेळपे-सांगे येथील साळावली जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या स्थळी भूस्खलन होऊन क्लेरी फ्लोक्युलेटर टाकीला भगदाड पडल्याने जी स्थिती निर्माण झालेली आहे त्याची मुंबई येथील जियो टेक्निकल इंजिनिअरिंगचे तांत्रिक सल्लागार एस. पी. भोसले यांनी पाहणी केली आहे. नवीन क्लेरी फ्लोक्युलेटर बांधण्यासंदर्भात आपला अहवाल व सल्ला ते येत्या दोन दिवसांत देणार आहेत. त्यानंतर पुढील दिशा ठरेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काम विभाग-12 चे कार्यकारी अभियंता श्रीकांत गावकर यांनी दिली.

गेल्या सोमवारी साळावली जलशुद्धिकरण प्रकल्पानजीकच्या एका क्लेरी फ्लोक्युलेटर टाकीच्या बाजूला दरड कोसळल्याने टाकीला भगदाड पडले होते. तसेच टाकीखालील माती वाहून गेली होती. त्याचबरोबर जमिनीला भेगा पडल्या होत्या. त्यामुळे क्लेरी फ्लोक्युलेटर एका बाजूने पूर्णपणे कलला होता. या ठिकाणी बुधवारी मुंबई येथील सल्लागार भोसले यांनी अन्य यंत्रणांच्या प्रतिनिधींसह संपूर्ण पाहणी केली. क्लेरी फ्लोक्युलेटरला पडलेले भगदाड, खचलेला भाग इत्यादींची माहिती त्यांनी गोळा केली. त्यांनी अहवाल व सल्ला दिल्यानंतर सदर क्लेरी फ्लोक्युलेटर कशा पद्धतीने बांधायचा ते ठरविले जाईल, असे गावकर यांनी स्पष्ट केले.

मुळात शेळपे येथील जलशुद्धिकरण प्रकल्प डोंगरावर जमीन सपाट करून बांधलेला असून ज्या टाकीला भगदाड पडले आहे व त्याच्याखालची माती वाहून गेली आहे तेथे मातीचा भराव घालून सदर टाकीचे बांधकाम करण्यात करण्यात आले होते. शिवाय खालच्या बाजूने संरक्षक भिंतीचे बांधकामही करण्यात आले होते. परंतु सतत पडणाऱया पावसामुळे भूस्खलन होऊन हा प्रकार घडला. 35 वर्षांपूर्वी हा क्लेरी फ्लोक्युलेटर बांधण्यात आला होता. आता तंत्रज्ञानात बदल झालेला असून नवीन तंत्रज्ञान पुढे आले आहे. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून सल्लागार आपला अहवाल सादर करणार आहेत, असे गावकर यांनी सांगितले. या पाहणीवेळी हल्लीच्या काळात अशा पद्धतीच्या क्लेरी फ्लोक्युलेटरचे बांधकाम केलेले कंत्राटदारही हजर होते.

Related posts: