|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘स्वदेश दर्शन’ अंतर्गत आणखी अर्थसहाय्य

‘स्वदेश दर्शन’ अंतर्गत आणखी अर्थसहाय्य 

प्रतिनिधी /पणजी :

केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत यापूर्वी देण्यात आलेला निधी वापरा, दुसऱया टप्प्यात आणखी अर्थसहाय्य मिळेल, असे आश्वासन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी काल गुरुवारी पणजीतील कार्यक्रमात बोलताना दिले. सदर योजनेतील पूर्ण झालेल्या तीन प्रकल्पांचे लोकार्पण तसेच दोन नव्या प्रकल्पांची पायाभरणी प्रसंगी ते बोलत होते. पणजीतील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.

हणजुणे-कांदोळी बीचवरील साधनसुविधा आणि मोरजी खिंड या तीन प्रकल्पांचे त्यांनी उद्घाटन केले तर आग्वाद जेल व मिनी कनव्हेशन सेंटर पाटो पणजी या दोन प्रकल्पांची कोनशिला बसविली.

गोवा पर्यटन क्षेत्रात देशासाठी ‘आयकॉन’

गोवा राज्य हे पर्यटन क्षेत्रात देशासाठी ‘आयकॉन’ आहे. देशभरात पर्यटनक्षेत्र वाढवावे म्हणून स्वदेश दर्शन योजना सुरु केली असून सर्व राज्यांना निधी देण्यात येतो. जी राज्ये निधी खर्च करतील त्यांनाच पुढील निधी मिळणार आहे. निधीचा वापर न करणाऱया राज्यांना तो मिळणार नाही, असे यावेळी पटेल यांनी स्पष्ट केले.

पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधी

गोवा राज्य या योजनेत चांगलेच प्रगतीपथावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी देशभरातील 17 ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे ठरविले असून त्यातील एक ठिकाण गोव्यात निश्चितच देऊ, असे आश्वासन पटेल यांनी दिले. त्यावर सुमारे रु. 20 कोटी खर्च करण्याचा इरादा आहे. दर्जेदार पर्यटन वाढवावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून पर्यटन क्षेत्रात निधीची तरतूद वाढवण्यात आली आहे. संपूर्ण जगात पर्यटन क्षेत्रात भारत देशाचे मानांकन वाढत असून 5 वर्षानंतर भारत देश प्रथम 10 देशात समाविष्ट होईल, अशी आशा त्यांनी प्रकट केली.

दर्जेदार पर्यटनासाठी सर्वांचा पाठिंबा आवश्यक

गोव्यातील पर्यटन उद्योग वाढला पहिजे. त्यासाठी आवश्यक त्या साधनसुविधा उलपब्ध करण्यावर सरकार भर देत असून वैद्यकीय पर्यटन वाढावे म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. हा उद्योग परप्रांतीयांच्या हातात गेला असून तो गोमंतकीयांनी ताब्यात घेण्याची व फुलवण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच पारंपरिक पद्धतीची किनार ठेवून हा पर्यटन उद्योग दर्जेदार व्हावा म्हणून सर्वांनी हातभार लावायला हवा. जीएसटी प्रकरणी सरकार काहीतरी उपाय काढेल असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

पर्यटनाच्या विविध प्रकल्पांना अनेक एनजीओ (बिगर सरकारी संस्था) अडथळे आणतात. ते त्यांनी बंद करावेत व प्रकल्पांना पाठिंबा देण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. त्यांच्या हस्ते पटेल यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, समई भेट देऊन सन्मान करण्यात आला तसेच पर्यटन खात्याच्या मोबाईल ऍपचाही शुभारंभ झाला.

Related posts: