|Sunday, October 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारताशी अपघाताने होऊ शकते युद्ध

भारताशी अपघाताने होऊ शकते युद्ध 

पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांची वल्गना

वृत्तसंस्था/ जीनिव्हा

जम्मू-काश्मीरमधील सद्यपरिस्थिती पाहता भारताबरोबर अपघाताने युद्ध होऊ शकते, अशी वल्गना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केली आहे. दोन्ही देशांना युद्धाचे परिणाम माहिती आहेत. सद्यस्थितीत काहीही घडू शकते, असेही ते म्हणाले. जीनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते.

 यावेळी कुरेशी म्हणाले, संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्काचे उच्चायुक्त मिशेल बॅचलेट यांनी भारत आणि पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱया काश्मीरला भेट द्यावी, असे निमंत्रण दिले आहे. त्यांनी दोन्ही प्रदेशाला भेट द्यावी. येथील वस्तुस्थिती जगासमोर मांडावी, असेही ते म्हणाले. दिल्लीत असणाऱया भारत सरकारच्या विचारधारेमुळे सद्यस्थितीत जम्मू-काश्मीरप्रश्नी द्विपक्षीय चर्चा होईल असे वाटत नाही, असे तुणतुणेही त्यांनी वाजवले. याप्रश्नी मध्यस्थ म्हणून अमेरिकेने भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, काश्मीरप्रश्नी पाकिस्तानने भारताबरोबर चर्चा करावी, असे संयुक्त राष्ट्राने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.