|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » निवडणुकीपुरते येणाऱयांना थारा नको

निवडणुकीपुरते येणाऱयांना थारा नको 

आमदार अनिल बाबर : पाच वर्षे घरी बसलेले बेरीज मारताहेत-तानाजी पाटील

प्रतिनिधी/ आटपाडी

साडेचार वर्षे गायब असणारे सिझनेबल पुढारी आत्ता आरती, वाढदिवसाच्या निमित्तान येत आहेत. निवडणुकीपुरतेच बाहेर पडणाऱयांचा डाव जनतेने ओळखला आहे. युती सरकारच्या सहकार्याने माझ्या प्रयत्नांना बळ मिळाले. म्हणुनच खानापुर विधानसभा मतदारसंघ विकासात अग्रेसर आहे. मतदारसंघाच्या विकासात जनतेचेही श्रेय असुन हा मतदारसंघ महाराष्ट्रात अग्रभागी ठेवु, असा विश्वास आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केला.

आटपाडी तालुक्यातील करगणी येथे सुमारे 2 कोटी रूपयांच्या विकासकामांच्या शुभारंभानिमित्त आयोजित सभेत आमदार अनिल बाबर बोलत होते. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पत्की, तानाजी पाटील, ऍड.सर्जेराव खिलारी, सरपंच गणेश खंदारे, उपसरपंच जब्बार मुल्ला, विष्णुपंत पाटील, साहेबराव पाटील, ऍड.धनंजय पाटील, बाळासाहेब जगदाळे, भिमराव व्हनमाने, विजय सरगर, दत्ता पाटील, अरविंद चव्हाण, तुकाराम जानकर, लक्ष्मी दबडे, संजय यमगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार अनिल बाबर म्हणाले, करगणीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील एकाचवेळी सर्वात मोठा निधी उपलब्ध करून त्याचा शुभारंभ होत असल्याचा आनंद आहे. युवा सरपंच गणेश खंदारे, उपसरपंच जब्बार मुल्ला व सर्व सहकाऱयांनी त्यासाठी केलेला पाठपुरावा उल्लेखनिय आहे. गत विधानसभा प्रचारावेळी शेतकऱयांच्या चेहऱयावरील आनंदासाठी मी आमदारकी मागितली. जनतेने भरभरून प्रेम दिले. आणि टेंभुच्या माध्यमातुन 80टक्के यश मिळुन शेती, शेतकरी उन्नतीचा पाया रचला गेला.

अद्यापही मतदारसंघातील 35 ते 38गावे टेंभुपासुन वंचित असुन मतदारसंघातील एकही गाव कृष्णेच्या पाण्यापासुन वंचित राहणार नाही, असे नियोजन करून तो प्रस्ताव मान्यतेसाठी दिला आहे. त्याचे डिसेंबर-जानेवारीमध्ये प्रत्यक्ष काम सुरू होईल, असा विश्वासही आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केला. टेंभुचे पंप 15 तारखेपर्यंत सुरू होतील व सर्वप्रथम पाणी आटपाडी तालुक्यात सोडले जाईल. जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद आजपर्यंत पाठीशी असुन येणाऱया कालावधीत अशीच ताकद उभी करून सिझनेबल पुढाऱयांना योग्य रस्ता दाखवा, असे आवाहनही आमदार बाबर यांनी केले.

तानाजी पाटील म्हणाले, 2004-14 या दहा वर्षात आटपाडी तालुका रसातळाला गेला. त्यावेळी टक्केवारीचा उद्योग चर्चेत आला. त्या कालावधीतील खुंटलेला विकास 2014नंतर आजपर्यंत अविरतरणे सुरू आहे. वयाची सत्तरी गाठुनही तरूणाईचा उत्साह घेवुन अनिलभाऊ काम करताहेत. त्यामुळेच उच्चांकी विकासकामे आटपाडी तालुक्यात उभी राहिली आहेत. दुकानदारी मोडलेली मंडळी आज सैरभैर होवुन बेरीज मारताहेत. जनता आणि विकासाकडे दुर्लक्ष असणारे घरी बसणारे एक होण्याची भाषा करताहेत. कोणी कितीही एक होवु द्या पण जनता अनिलभाऊंच्या सोबत आहे.

पाच वर्षे न दिसणारे आत्ता गोडबोलुन लोकांसमोर येताहेत. त्यांना भुलु नका. जनतेनेच निवडणुक हाती घेतली असुन ही प्रचाराचीच सभा समजुन कार्यकर्त्यांनी कामाची बेरीज मारून विरोधकांना मात द्यावी, असे आवाहनही तानाजी पाटील यांनी केले. कष्टामुळेच अनिलभाऊ हे जनतेच्या ऱहदय़ात असुन टेंभुचा डाव अर्ध्यावर मोडु नये, म्हणुन विरोधकांना जागा दाखवुन येणाऱया विधानसभेला अनिलभाऊंच्या पाठीशी ताकद उभी करा, असे आवाहनही तानाजी पाटील यांनी केले.

अण्णासाहेब पत्की यांनी कामाचा माणुस अनिलभाऊ बाबर यांच्या पाठीशी जनतेने एकजुटीने उभे रहावे, असे आवाहन करून महावितरणच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. सरपंच गणेश खंदारे, उपसरपंच जब्बार मुल्ला, विजय सरगर, दत्ता पाटील आदिंनी ग्रामपंचायतच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन आमदारांना सुपुर्द केले. शिवसेना महिला आघाडीच्या करगणी जि.प.गट अध्यक्षपदी लक्ष्मी दबडे यांची निवड केल्याचे साहेबराव पाटील यांनी जाहीर केले. सुत्रसंचलन परशुराम पवार यांनी केले. आभार दत्ता खिलारी यांनी मानले.

Related posts: