|Sunday, October 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाककडून 2050 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाककडून 2050 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन 

परराष्ट्र मंत्रालयाची माहिती : कारवाईत 21 भारतीयांचा मृत्यू

पाकिस्तानकडून सतत घुसखोरीसत्र सुरूच/ भारतीय सैन्याकडून पाकला चोख प्रत्युत्तर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय सैन्याकडून सतत चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतरही पाकिस्तान आपल्या चिथावणीखोर कृत्यापासून थांबला नाही. वर्षभरात पाकिस्तानने तब्बल 2050 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून सरकार चिंतेत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून एका वर्षामध्ये झालेल्या हल्ल्यात 21 भारतीय नागरिक ठार झाले असून, सीमेतून होणाऱया घुसखोरीमुळे संवेदनशील आहोत. पाकिस्तानी सैनिक भारतीय नागरिकांसह सीमेवरील नाक्यांना लक्ष्य करत आहेत, असेही रवीश कुमार यांनी सांगितले.

आम्ही सतत पाकिस्तानच्या सैन्याकडे शांतता प्रस्तापित करण्याची मागणी करत आहोत, मात्र ते याकडे लक्ष देत नाहीत. भारतीय सैन्य सीमेवरून होणारी घुसखोरी        थांबविण्यासाठी प्रयत्न करत असून, शस्त्रसंधीच्या उल्लंघनास चोख प्रत्युत्तर देत आहे, असेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानकडून शनिवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्हय़ातील मंजाकोटमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. यानंतर 5 किलोमीटरच्या टप्प्यातील शाळा बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या पुंच्छ जिल्हय़ातही नियंत्रण रेषेनजीकची गावे आणि सैन्याच्या नाक्यांवर पाक सैन्याने गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.