|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वंचितांना एकत्र करा, भूलथापांना बळी पडू नका

वंचितांना एकत्र करा, भूलथापांना बळी पडू नका 

संसदीय मंडळाचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील यांचे आवाहन

प्रतिनिधी/ सोलापूर

लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱयांनी चांगले काम केले आहे. तसेच काम विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी करा, कोणत्याही भूलथापाला बळी न पडता वंचित घटकांना एकत्रित करून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा असे, आवाहन संसदीय मंडळाचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील यांनी केले.

    सोमवारी हुतात्मा स्मृती मंदिरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळा नवनाथ पडळकर, अर्जुन सलगर, राज्य उपाध्यक्ष शंकरराव लिंगे, प्रदेश महासचिव सचिन माळी, बाळासाहेब बंडगर, अमृता अलदर, जिल्हा प्रभाकर गायकवाड, विठ्ठल पाथरूट, उमर शेख, जावेद पटेल, प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, नगरसेविका ज्योती बमगोंडे, बबन शिंदे, जिल्हा संघटक गौतम भालशंकर आदी उपस्थित होते.

   पुढे पाटील म्हणाले, वंचित आघाडीमुळे सर्व प्रस्थापितांना धडकी भरली आहे. प्रत्येक ओबीसीपर्यंत राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर पोहोचले पाहिजे. रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख रामदास आठवले हे संसदेचे जोकर आहेत. भाजपकडून सेटलमेंट करून मंत्रीपद मिळवले आहेत. त्याचप्रकारे बाळासाहेब आंबेडकर यांनी सेटलमेंट केली असती तर देशाचे कायदा मंत्री झाले असते. मात्र बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमाने नेते आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वावर चालणारे एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत.

  पुढे पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत 25 मुस्लीम उमेदवार देण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला असून, ते निवडून आणण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. मुस्लीम समाजाचे उल्मा बोर्ड यासह स्वाभिमानी पक्ष वंचित सोबत राहणार आहे.

  आनंद चंदनशिवे म्हणाले, सोलापूर जिह्याचा विकास झालाच नाही. पक्षांतर हे नावासाठी होत आहे. मात्र जिह्याचा विकास झालेला नसून, दोन मंत्र्यांच्या भांडणामुळे सोलापूरचा विकास खुंटला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास विकास करून दाखवू. यावेळी विकास इंगळे, सचिन माळी, शंकरराव लिंगे, डॉ. यशपाल लिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शाहीर शीतल साठे, सचिन माळी यांनी एकापेक्षा एक शाहिरी जलसा सादर करुन समाजप्रबोधन केले. 

   ईव्हीएममुळेच भाजप सरकार सत्तेवर

लोकसभेच्या निवडणुकीत मोदी सरकार हे ईव्हीएममुळेच सत्तेवर आले आहे. मागील निवडणूक जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी 2 हजार सॉफ्टवेअर इंजिनियर कामाला लावले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी विधानसभेची निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केलेली आहे. 

  सत्ता संपादनाच्या महारॅलाचे जंगी स्वागत

शहरातील विविध ठिकाणी सत्ता संपादन महारॅली काढल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची ही महारॅली सोमवारी तुळजापूर नाक्याजवळ आली. ही महारॅली आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठय़ा जल्लोषात स्वागत केले. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, ‘बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.  तुळजापूर नाकामार्गे संभाजी चौक, शिवाजी चौकमार्गे हुतात्मा चौक आणि हुतात्मा स्मृती मंदिर याठिकाणी रॅलीचा समारोप झाला.

 

Related posts: