|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महाजनादेश यात्रेत कडकनाथ कोंबडय़ा सोडल्या

महाजनादेश यात्रेत कडकनाथ कोंबडय़ा सोडल्या 

वार्ताहर / कुंडल

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताकारी-पलूस मार्गावर कुंडलजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी यात्रेच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये कोंबडय़ा सोडून व अंडी फेकून गनिमी कावा पद्धतीने आंदोलन केले .

कडकनाथ कोंबडी प्रकरणी महारयत संस्थेने महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य राज्यातील  शेतकरी व युवकांना जवळजवळ पाचशे कोटी रूपयांची फसवणूक केली असून यामध्ये मंत्रीमंडळातील एका मंत्र्याच्या मुलाचा सहभाग असल्याचा संशयावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला धारेवर धरले आहे. शेतकरी संघटने बरोबरच कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीही यावर आक्रमक झाली असून ऍड. अमित शिंदे, दीपक लाड यांचेसह कडकनाथ बाधित शेतकरी यांनी एकवटून महाजनादेश यात्रेत कोंबडय़ा सोडून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी संघर्ष समिती व  स्वाभिमानीच्या संदिप राजोबा सह  प्रमुख कार्यकर्त्यांना कालपासूनच स्थानबद्ध केले होते. मात्र महाजनादेश यात्रा कुंडलजवळ आली असता स्वाभिमानीच्या पाच सहा कार्यकर्त्यांनी गनिमीकावा पद्धतीने अचानक रस्त्यावर येऊन वाहनांच्या ताफ्यात कोंबडय़ा सोडल्या. अंडी फेकली. तेवढय़ात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली व त्यांना बाजूला केले .

भाजपा कार्यकर्त्यांची गुंडगिरी

स्वाभिमानीचे कार्यकर्ते यात्रेसमोर कोंबडय़ा सोडून आंदोलन करत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यानी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत ढकलून दिले. या धक्काबुक्कीत स्वाभिमानीचे दोन कार्यकर्ते महाजनादेश यात्रेतील ताफ्यातील गाडीखाली पडता पडता वाचले. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या या गुंडगिरीवर नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागला ..

…तर परिणाम भोगावे लागतील

महाजनादेश यात्रेदरम्यान आंदोलन करणाऱया स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या गुंडांनी धक्काबुक्की करत मारहाण केली.  ही दडपशाही असून पोलीसही यात सामील असून आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना जर काही इजा झाली तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील.

राजू शेट्टी, माजी खासदार.

Related posts: