|Sunday, March 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » समीक्षेचे वाजंत्री

समीक्षेचे वाजंत्री 

आपण जे लिहितो तेच चांगलं, आपल्या लेखनातील प्र्रत्येक शब्द अंतिम, हा अंतिम शब्द म्हणजेच आपल्या लेखनाची प्रयोगशीलता अशी मिजास मिरवत फिरणारे लेखक-कवी आणि त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे वाजंत्री समीक्षक आपल्या आजूबाजूला खूप आहेत. परंतु, ज्यांना खरंच काही चांगलं लिहायचे आहे, त्यांनी अशा वाजंत्री समीक्षकांपासून सावध राहायला हवे. त्यातच त्यांचं भलं आहे. डॉ. गवस यांचे वक्तव्य हेच तर सूचित करते!

 

साहित्य आणि समीक्षा यांचं अतुट नातं आहे. हे नातं अधिक घट्ट करायचं असेल, तर समीक्षेचा साहित्य व्यवहार डोळस असायला हवा. असे झाले, की त्या-त्या भाषेतील साहित्य, एकूण कला व्यवहार समृद्ध होत जातो. लेखक-कलावंताला त्यातून सजग भान येते. हे भान त्याची झापडबंद साहित्यदृष्टी स्वच्छ करण्यास पूरक ठरते. त्यातून त्याची लिहिण्याची समज वाढत जाते. पर्यायाने लेखक-कवी म्हणून त्याची वाढ होते. मात्र, अपवाद वगळता असे समीक्षा लेखन होते का? किंवा छोटय़ा-मोठय़ा साहित्य संमेलनात त्याला पूरक ठरेल, अशी वक्तव्ये, स्पष्ट चर्चा, होते का? याचे उत्तर नाहीच, असे येईल. या सगळय़ा पार्श्वभूमीवर ‘कादंबरीकार प्रवीण बांदेकर’ या विषयावर औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन करताना ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. राजन गवस यांनी ‘सध्याचे दिवस केवळ वाजंत्री समीक्षेचे’ असल्याचे वक्तव्य केले. अर्थात ते योग्यच असून ‘तुझे-माझे चांगले’ अशा साहित्य समीक्षा व्यवहाराचे ते पीस काढणारेच आहे.

ज्ये÷ समीक्षक गुरुवर्य म. सु. पाटील एकदा म्हणाले होते, समीक्षकांनी लेखनात सगळेच चांगलं आहे, असं सांगत बसू नये. किमान लेखक-कवीची असलेली गुणवत्ता अधिक कशी वाढेल, यादृष्टीने आवश्यक तेवढी तरी स्पष्ट भूमिका   समीक्षा लेखनात घ्यायला हवी आणि दुसऱया बाजूला नव्या लेखक कवीचा लिहिण्याचा कणा मोडून जाऊ नये एवढेही समीक्षकाने कठोर होऊ नये. डॉ. गवस यांच्या या वक्तव्यानंतर पाटील सरांच्या या वक्तव्याची आठवण होणे साहजिकच आहे. कारण पाटील सरांनी नेहमीच खेडय़ापाडय़ातील नव्या लिहित्या मुलांना प्रोत्साहन दिले. वेळप्रसंगी त्यांच्यावर लिहिले. परंतु, हे लिहिताना त्या-त्या लेखनाची मर्यादा स्पष्ट शब्दात नोंदविताना दुसऱया बाजूला नवीन लिहिता लेखक नाउमेद होऊ नये, याचीही काळजी घेतली. काहीवेळा तर त्यांच्या या स्वच्छ समीक्षा दृष्टीचा असा परिणाम झाला की, जे कवी स्वतःच्या प्रेमात होते, त्यांनी मात्र पाटील सरांपासून चार हात दूर राहणेच पसंत केले. पुढे मात्र अशा कवींचे एवढे नुकसान झाले, की पाटील सरांनी त्यांची गुणवत्ता त्यांच्या लक्षात आणून दिली. त्याकडे दुर्लक्ष करून काहींनी आयुष्यभर मंचीय कवितेचीच जंत्री वाजविण्यात धन्यता मानली. अशावेळी सध्याची वाजंत्री समीक्षा अशा नव्या लेखक-कवींना बुजवित आहे. त्यामुळे यापेक्षा नव्या समीक्षेचे मापदंड तयार करता येतात का, हे पाहणे आवश्यक ठरत आहे, या डॉ. गवस यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होत आहे.

अलीकडल्या काळात साहित्य लेखनाचा तर मळाच बहरलेला आढळतो. इतरही कलाप्रातांत अशीच परिस्थिती आहे. साहित्यात कविता विपुल प्रमाणात लिहिली जात आहे. कादंबरी लेखन गुणात्मक पातळीवर किती असा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा हाताच्या बोटावर मोजावेत, असेच कादंबरीकर सापडतात. कथेत तर प्रासंगिकताच जास्त. इतर कलाप्रांतात गायनाला तर अमाप पीक आलेले दिसते. आता कोणत्याही कलाप्रकारात अशी वाढ होत असेल, तर सामान्यस्तरातील कलावंत पुढे येतो आहे, असे स्पष्ट होते आणि ते चांगलंच आहे, असं म्हणायला पाहिजे. मात्र, अशावेळी आपल्या लेखनाचे, कलेचे सत्त्व शोधायचे असेल, तर आपल्या कलेची-लेखनाची मर्मग्राही दृष्टीने चिकित्सा करणाऱया वर्गाशी सातत्याने जोडून राहायला हवे. यासाठी लिहित्या माणसाकडे सतत नम्रता हवी. आज मात्र ही भावना लयास गेलेली आहे. आपण जे लिहितो तेच चांगलं, आपल्या लेखनातील प्रत्येक शब्द अंतिम, हा अंतिम शब्द म्हणजेच आपल्या लेखनाची प्रयोगशीलता अशी मिजास मिरवित फिरणारे लेखक-कवी आणि त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे वाजंत्री समीक्षक आपल्या आजूबाजूला खूप आहेत. परंतु ज्यांना खरंच काही चांगलं लिहायचे आहे, त्यांनी अशा वाजंत्री समीक्षकांपासून सावध राहायला हवे. त्यातच त्यांचं भलं आहे. डॉ. गवस यांचे वक्तव्य हेच तर सूचित करते. अपवाद वगळता बहुसंख्य कवी मात्र या सगळय़ाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना आज दिसतात. ‘ओला चारा बैल माजले’ अशी त्यांची अवस्था आहे. सोशल मीडियाच्या कुरणात ते सुखासमाधानात आहेत. असं कवींचं स्वतःवरचं प्रेखsम वाढायला लागलं, की त्याला इतर कोण काही बोलतो आहे, ते समजून घेण्याचेही भान राहत नाही. त्यामुळे हे प्रेम अधिकच वाढत जाऊ लागले, की एक तर कवी  प्रेमाचा शायर बनतो किंवा आपलीच कविता कशी सर्वश्रे÷ आहे हे सांगण्यातच  अख्खं आयुष्य वाया घालवितो. परंतु कविता लिहिणे एवढी सोपी गोष्ट आहे का?  असे असते, तर कोणत्याही चांगल्या कवीला जगण्याच्या भुकेएवढीच चांगली कविता लिहिण्याची भूक लागली नसती. मात्र, ज्यांना अशा भुकेच्या गरजेपेक्षा प्रसिद्धी, पुरस्कार आणि त्यातून निर्माण होणारे स्वतःचे व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे वाटते ते कवितेच्या इतरांच्या चांगल्या वक्तव्याकडे अगदी ठरवून दुर्लक्ष करतात. हे आता सार्वत्रिक झाले आहे. मध्य प्रदेश सरकारचा भारतीय पातळीवरचा राष्ट्रीय हिंदी सन्मान ज्यांना नुकताच जाहीर झाला, ते ज्ये÷ कवी-समीक्षक-अनुवादक डॉ. चंद्रकांत पाटील यांनी आता आताच एका कार्यक्रमात चांगल्या कवितेबद्दलचे वक्तव्य केले. ते मुळातूनच समजून घेण्याची गरज आहे. पाटील म्हणतात, कविता जगण्याच्या सूक्ष्म व गुंतागुंतीच्या अनुभवावर आधारित असावी. तिचा गाभा भावनात्मक आणि  ज्ञानात्मक असला पाहिजे. कविता अंतःप्रेरणेतून यायला हवी. कवितेने व्यक्तीकडून समष्टीकडे, खासगीपणातून सार्वजनिकतेकडे, जगण्यातून जीवनाकडे जावे. कवितेतील सूचकतेने व संदिग्धतेने वाचकांच्या कल्पनाशक्तीला आवाहन केले पाहिजे. कवितेचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रवास अनुमान करता येण्यासारखा असू नये. मात्र, दुर्दैवाने अलीकडल्या काळातील कवितेच्या समीक्षेचे वाजंत्री व कवीही याचा गांभिर्याने विचार करत नाहीत. वाजंत्री समीक्षेची अनेक कारणे सांगता येतील असे म्हणतात, समाजात ज्या गोष्टी घडतात, त्याचेच चित्र लेखक आपल्या शब्दातून मांडतो. परंतु आता जातीय अस्मिता उफाळून येत आहे म्हणून प्रत्येक जातीच्या गटाचे समीक्षक निर्माण होणे हे काही निकोप साहित्यिक व्यवहाराचे लक्षण नव्हे. मात्र, अलीकडल्या काळात आपल्या जातीनुसार लेखक-कवी संघटित होताना दिसतात. त्यांचे सोशल मीडियावर त्या प्रकारचे गट तयार होत आहेत आणि जातीची अस्मिता कुरवाळतच लेखकांना अपेक्षित अशी त्याच्या-त्याच्या लेखनाची समीक्षा केली जातेय. अर्थात वाजंत्री समीक्षा यापेक्षा वेगळी काही नसतेच!

अजय कांडर

Related posts: