|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हय़ातील तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

जिल्हय़ातील तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश 

ग्रीन पॉवर शुगर, शरयू ऍग्रो व देसाई कारखान्यांचा समावेश :

प्रतिनिधी/ सातारा

गळीत हंगाम 2018-19 मधील एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी सातारा जिह्यातील तीन साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जारी केले आहेत. तीन कारखान्यांनी मिळून एकूण 23 कोटी 59 लाख 41 हजार रुपये थकीत ठेवले आहेत. जप्ती आदेशामध्ये ग्रीन पॉवर शुगर्स, शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज लि. आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड या कारखान्याने सन 2018-19 च्या हंगामातील गाळप उसाचे थकीत एफआरपी 5 कोटी 2 लाख 11 हजार रुपये थकीत आहेत. फलटण तालुक्यातील शरयु ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याने सन 2018-19 च्या हंगामातील गाळप उसाच्या थकीत एफआरपीची रक्कम 16 कोटी 23 लाख 71 हजार रुपये शेतकऱयांना देणे बाकी आहे. पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2018-19 च्या हंगामातील गाळप उसाच्या थकीत एफआरपीची रक्कम 2 कोटी 33 लाख 59 हजार रुपये शेतकऱयांचे थकीत ठेवली आहेत.

या तीनही कारखान्यांच्या आदेशात नमूद केले आहे की, थकीत एफआरपीची रक्कम आणि त्यावर 15 टक्के दराने होणारे व्याज या रक्कमा कारखान्यांकडून जमीन महसूलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन त्यामधून ही रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्ताऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी. सदर मालमत्तेची जप्ती करुन त्याची विहीत पध्दतीने विक्री करुन या रक्कमेतून ऊस (नियंत्रण) आदेश, 1966 मधील तरतुदीनुसार देय बाकी रक्कमेची खात्री करुन संबंधितांना विलंबित कालावधीसाठी 15 टक्के व्याजासह देण्यासाठी जिल्हाधिकाऱयांना कारवाई करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

Related posts: