|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ‘हाउडी मोदी’साठी हय़ूस्टन सज्ज

‘हाउडी मोदी’साठी हय़ूस्टन सज्ज 

कार रॅलीचे आयोजन : पंतप्रधान मोदी अन् ट्रम्प यांचे संबोधन आज

वृत्तसंस्था / हय़ुस्टन

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील हय़ुस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमापूर्वी हय़ूस्टन शहर मोदींच्या पोस्टर्सनी रंगून गेले आहे. रविवारी होणाऱया या भव्य सोहळय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 50 हजारपेक्षा अधिक भारतीय अमेरिकनांना संबोधित करणार आहेत. शहरातील कानाकोपऱयात या कार्यक्रमाशी संबंधित पोस्टर्स दिसून येत असून लोकांना याबद्दल माहिती देण्यासाठी रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमापूर्वी शुक्रवारी एनआरसी स्टेडियममध्ये एका कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीत 200 हून अधिक कार्सनी भाग घेतला होता. याचे आयोजन जगातील सर्वात मोठय़ा (भारत) आणि सर्वात जुन्या (अमेरिका) लोकशाहीमधील मैत्रीच दर्शन घडवून आणण्यासाठी करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान आयोजकांनी ‘नमो अगेन’च्या घोषणा देत पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.

कार्यक्रमाचे आयोजक आणि स्वयंसेवकांनी मोठय़ा संख्येत रॅलीत भाग घेतला. रॅलीदरम्यान अमेरिका आणि भारतीय ध्वज असलेल्या कार्स रस्त्यावर दिसून आल्या. हाउडी मोदी हा कार्यक्रम पोप फ्रान्सिस यांच्यानंतर विदेशी नेत्यासाठी आयोजित झालेला सर्वात मोठा सोहळा ठरणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

संबंध वृद्धिंगत होणार

पंतप्रधान मोदी शुक्रवारी रात्री 11.30 वाजता अमेरिकेच्या 7 दिवसीय दौऱयासाठी रवाना झाले. या दौऱयाने भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये नवी ऊर्जा येणार आहे. हय़ुस्टनमध्ये एका सामुदायिक कार्यक्रमात सहभाग, संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या 74 व्या अधिवेशनाला संबोधित करण्यासह प्रमुख ऊर्जा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांशी चर्चा करणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

दोन तासांसाठी जर्मनीत

अमेरिकेच्या दौऱयादरम्यान तांत्रिक थांब्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदींचे विमान दोन तासांकरता जर्मनीत थांबले होते. जर्मनीतील भारतीय राजदूत मुक्ता तोमर यांनी त्यांचे स्वागत केले.

मोदींचा होणार गौरव

पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी नवे निर्णय जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींना बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनकडून ग्लोबल गोलकीपर गोल्स अवॉर्ड 2019ने सन्मानित केले जाणार आहे.

मुसळधार पाऊस पडत असूनही आयोजकांच्या उत्साहात तसूभरही घट झालेली नाही. हा कार्यक्रम एनआरजी स्टेडियममध्ये आयोजित होणार आहे. वादळामुळे टेक्सासच्या अनेक भागांमध्ये आणीबाणी घोषित करावी लागली आहे. हाउडी मोदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 1500 हून स्वयंसेवक अहोरात्र झटत आहेत.  मोदी आणि ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, खासदार आणि महापौर यात सामील होणार आहेत. तीन तासांचा हा कार्यक्रम भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजल्यापासून 11.30 वाजेपर्यंत चालणार आहे.

व्यापारप्रकरणी मोठा निर्णय शक्य

‘हाउडी मोदी’च्या आयोजनानंतर अमेरिका आणि भारतादरम्यान व्यापाराप्रकरणी मोठा निर्णय जाहीर होऊ शकतो. दोन्ही देशांदरम्यान व्यापाराच्या क्षेत्रातील तणाव दूर करण्यासाठी मोदी तसेच ट्रम्प मोठे पाऊल उचलू शकतात. दोन्ही देशांदरम्यान एका मर्यादित व्यापार कराराबद्दल चर्चा सुरू आहे. या करारावर दोन्ही नेते स्वाक्षरी करू शकतात. या करारामुळे काही अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क कमी होणा आहे. तर भारतीय उत्पादनांना अमेरिकेतील निर्यातीसाठी प्राधान्य व्यवस्था पुन्हा लागू होणर आहे.

Related posts: