|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » प्रत्येक पोलीस व्हावा ‘इन्स्पेक्टर चौगुले’ : मीरा बोरवणकर

प्रत्येक पोलीस व्हावा ‘इन्स्पेक्टर चौगुले’ : मीरा बोरवणकर 

ऑनलाईन टीम / पुणे :

खाकी वर्दीच्या आतमध्ये एक अबोल माणूस दडलेला असतो. तोही भावनाशील, संवेदनशील आणि तितकाच कठोरही असतो. गुन्हेगारांना धडकी भरेल, जनसामान्यांना आधार वाटेल, असा इन्स्पेक्टर चौगुले प्रत्येक पोलिसांमध्ये मला दिसतो. पोलीस कर्मचाऱयांपासून तर अधिकाऱयांपर्यंत सगळेच समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय काय प्रयत्न करतात, याचा आढावा ‘इन्स्पेक्टर चौगुले’ आपल्याला देतो, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर यांनी केले. हे पुस्तक खाकी वर्दीतील प्रत्येक पोलिसाला अर्पित केल्याचेही बोरवणकर म्हणाल्या.

पुणे इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये डॉ. मीरा बोरवणकर लिखित ‘इन्स्पेक्टर चौगुले’ या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते झाले. यावेळी कॅप्टन (निवृत्त) चंद्रशेखर चितळे, विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संयोजिका मंजिरी प्रभू, पुस्तकाच्या अनुवादक सायली गोडसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर चितळे यांनी डॉ. बोरवणकर व डॉ. व्यंकटेशम यांच्याशी संवाद साधला.

मीरा बोरवणकर म्हणाल्या, ऐंशी-नव्वदच्या दशकात महिला पोलीस अधिकाऱयांना फारसे स्वीकारले जात नव्हते. पुरुष पोलिसांना महिलांच्या हाताखाली काम करणे रुचत नसे. परंतु, मला या प्रवासात अनेक इन्स्पेक्टर व इतर अधिकाऱयांची मोलाची साथ मिळाली. अनेकांनी माझ्यासोबत चांगले काम केले. त्यातूनच मला ‘इन्स्पेक्टर चौगुले’ सापडला. मी लिहिलेल्या ‘इन्स्पेक्टर चौगुले’ या लेखमालेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातूनच हे पुस्तक पूर्णत्वास आले. अनेक गुन्हे उलगडताना हा इन्स्पेक्टर चौगुले कसा वागतो, त्याचा स्वभाव काय, कोणत्यावेळी कोणती भूमिका तो घेतो अशा विविध कथा यामध्ये आहेत. आपण गुह्यांचा करत असलेला तपास हे एक संशोधनच आहे. त्यामुळे त्याचे लिखाण आपल्याकडून व्हायला हवे.

के. व्यंकटेशम म्हणाले, हे पुस्तक म्हणजे पोलीस आणि नागरिकांसाठी मार्गदर्शक पुस्तिकाच आहे. अनेक कनिष्ठ अधिकारी आपल्याला काहीतरी सांगू पाहतात. त्यांच्या शांततेमागे बराच मोठा अर्थ असतो. तो वरिष्ठ अधिकारी म्हणून आपल्याला समजून घेता आला पाहिजे. ‘इन्स्पेक्टर चौगुले’ या पात्राने तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम घेण्याची गरज असते. पोलीस बोलत नाहीत. 12-15 तास काम करूनही पोलीस त्याची तक्रार करत नाहीत. पण त्यांना बोलते करून त्यांच्यावर पुस्तक प्रकाशित केले आहे. पोलिसांच्या संदर्भातील साहित्य निर्मिती येत्या काळातही सुरूच राहील.

Related posts: