|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » कर्माची कक्षा विस्तारली तर भाषा समृद्ध होईल : सदानंद मोरे

कर्माची कक्षा विस्तारली तर भाषा समृद्ध होईल : सदानंद मोरे 

ऑनलाईन टीम / पुणे :

केवळ आंदोलने, उपोषणे करून मराठी वाढणार नाही. त्यासाठी आपल्यातील सर्जनशीलतेला चालना देऊन केलेल्या नवनिर्मितीला मराठीची ओळख प्राप्त झाली पाहिजे. आपल्या कर्माच्या कक्षा विस्तारून मराठी भाषेचा वापर जागतिक स्तरावर झाला, तरच मराठी भाषा समृद्ध होऊ शकेल, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

बाणेर रस्त्यावरील यशदा येथे विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने ‘मराठी आज आणि उद्या’ या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. मोरे बोलत होते. प्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे, संदीप तापकीर आदी उपस्थित होते. सर्जन व संपादक डॉ. सदानंद बोरसे हे कार्यक्रमाचे संवादक होते. यावेळी विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित डॉ. देशमुख लिखित ‘आकाश जिंकणार मी’ या मराठी पुस्तकाचे, तसेच ‘नंबर वन’ या इंग्रजी पुस्तकाच्या मुखपृ÷ाचे प्रकाशन झाले.

सदानंद मोरे म्हणाले, कर्माची कक्षा विस्तारली तरच भाषा समृद्ध होऊ शकते. मराठी माणसाने एखाद्या क्षेत्रांत नवनिर्मिती केली, तर त्याला मराठी म्हणून ओळख मिळावी. प्रत्येक भाषा त्यात्या समूहाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असते. एखादी भाषा असमर्थ ठरते, तेव्हा दुसऱया भाषेची मदत घ्यावीच लागते. परिपूर्ती करणारी भाषा घडवली जावी. इंग्रजी सुधारण्यासाठी आधी मराठीत सुधारणा आवश्यक आहेत. मराठीतून ज्ञान व्यवहार व्हायला हवा. फक्त मराठी पुस्तकाचा अनुवाद केल्याने मराठीचा प्रसार होणार नाही. तर भाषेची व्यवहारीक व्याप्ती वाढली जावी. पहिली पासून 12 वीपर्यंत मराठीच्या पाठयपुस्तकात साहित्य शिकविले जाते. व्यवहारी भाषा त्यात शिकविली जात नाही. साहित्यासह व्यवहारीक मराठी भाषेच्या धडय़ांची जोड दिली तर मराठी भाषीक व्यवहार वाढण्यास मदत होईल. आपल्या भाषेत प्रत्येक्ष व्यवहार वाढविण्यासाठी हे आवश्यक आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात मराठीची वापरली पाहिजे.

देशमुख म्हणाले, इंग्रजी शाळांचे मराठीकरण आणि मराठी शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आज इंग्रजी शाळांची संख्या वाढली आहे. मुलांना इंग्रजी शाळेत घालायची पालकांची मानसिकता झाली आहे. आशा वेळेस उत्तम इंग्रजीसह उत्तम मराठी येण्यासाठी कायदा उपयुक्त ठरेल. सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची करणे आवश्यक आहे. तसेच शाळांमधून गुणवत्ता पूर्ण मराठी शिकवली गेली पाहिजे. मराठी सक्ती कायद्याने बरेच प्रश्न सुटतील.

Related posts: