|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » दहशतवादी हल्ले रोखणार ‘नेटग्रिड’

दहशतवादी हल्ले रोखणार ‘नेटग्रिड’ 

जानेवारी 2020 पासून होणार कार्यान्वित : दहशतवादविरोधी कारवाईत समन्वय

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली 

 गुप्त माहिती जमा करण्याशी संबंधित भक्कम यंत्रणा ‘नेटग्रिड’ जानेवारी 2020 पासून कार्यान्वित होणार आहे. 3400 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची गरज 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर व्यक्त करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतल्यावर संबंधित कामाला वेग देण्यात आला आहे. प्रत्यक्ष वेळेत माहिती प्राप्त करत संशयास्पद दहशतवादी आणि त्यांचे हल्ले रोखणे हा नेटग्रिडचा उद्देश असणार आहे.

सर्व शक्यता पाहता नेटग्रिड पुढील वर्षाच्या प्रारंभापासून कार्यरत होणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या अधिकाऱयाने रविवारी दिली आहे. नेटग्रिडमुळे दहशतवादविरोधी यंत्रणांना एकीकृत कारवाई करण्यास मोठी मदत होणार आहे. अन्य देशातील यंत्रणांचा अभ्यास करत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

गुप्त माहितीचा साठा

नेटग्रिडजवळ गुप्त माहिती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक विदेशी प्रवाशाचा प्रवेश तसेच देश सोडण्याची स्थिती, बँकिंग आणि आर्थिक देवाणघेवाण, पेडिट कार्डांची खरेदी, दूरसंचार, वैयक्तिक करदाते, हवाई प्रवासी, रेल्वे प्रवाशांशी संबंधित डाटासह अन्य माहितीही उपलब्ध असणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 वापरकर्त्या यंत्रणा आणि 21 सेवाप्रदात्यांना नेटग्रिडशी जोडले जाणार आहे. तर उर्वरित टप्प्यांमध्ये 950 संघटना आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये 1000 संघटनांना याच्याशी जोडण्यात येणार आहे.

सुरक्षा यंत्रणांना सहाय्य

इंटेलिजेन्स ब्युरो (आयबी), रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (रॉ), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी), महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), वित्तीय गुप्तचर शाखा (एफआययू), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी), केंद्रीय उत्पादन तसेच सीमाशुल्क मंडळ (सीबीईसी), केंद्रीय उत्पादन शुल्क तसेच गुप्तचर महासंचालनालय (डीजीसीईआय) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) या 10 यंत्रणांना प्रत्यक्षवेळेत डाटा प्राप्त होईल.

नेटग्रिडची आवश्यकता

प्रारंभिक टप्प्यात राज्यस्तरीय सुरक्षा यंत्रणांना नेटग्रिडचा डाटा थेटपणे उपलब्ध होणार नाही. नेटग्रिडची आवश्यकता 2008 मध्ये झालेल्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अधेरेखित झाली होती. या हल्ल्यांनी सुरक्षा यंत्रणांकडे प्रत्यक्ष वेळेत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध असण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याचे उघड झाले होते. सुरक्षा दलांकडून माहिती प्राप्त करत त्याचा एकत्रित डाटाबेस नेटग्रिडमध्ये उपलब्ध होणार आहे.हा डाटा अन्य यंत्रणांना उपलब्ध होणार असल्याने दहशतवादी हल्ले टाळण्यास मोठी मदत होणार आहे.

नेटग्रिडचे महत्त्व…

? भारतात विविध दहशतवादी गटांनी वेळोवेळी हल्ले घडवून आणले आहेत. असे असूनही या दहशतवादी जाळय़ांचा एकत्रित डाटाबेस देशात उपलब्ध नाही.

? महत्त्वाची माहिती संग्रहित करत त्याद्वारे स्थितीचे आकलन करणे सोपे ठरणार आहे. कित्येक महिन्यांचा तपशील काही मिनिटांमध्ये पडताळता येणार आहे.

? यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाची समस्या नेटग्रिडमुळे दूर होणार आहे. संस्थांदरम्यान डाटा हस्तांतरण करणे सुलभ ठरणार आहे.

? तातडीच्या प्रसंगात अनेकदा केंद्र तसेच राज्य यांच्यात सहकार्याचा अभाव दिसून यायचा. पण नेटग्रिडमुळे यावर बऱयाचअंशी मात करणे शक्य होणार आहे.

Related posts: