|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बोरी पुलावर 11 पासून एकेरी वाहतूक दहा दिवस चालणार दुरूस्तीकाम

बोरी पुलावर 11 पासून एकेरी वाहतूक दहा दिवस चालणार दुरूस्तीकाम 

प्रतिनिधी /मडगाव :

बोरी पुलाच्या दुरूस्तीकामाला 11 ऑक्टोबरपासून प्रारंभ केला जाणार असून हे काम दहा दिवस चालणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंते श्री. देसाई यांनी दिली आहे. बोरी पुलाच्या मध्यभागी असलेल्या जोडणीच्या कमानीवर हे दुरूस्तीकाम हाती घेतले जाणार आहे.

पुलाच्या जोडणीच्या कमानी कमकुवत झाल्याने, या भागावरून अवजड वाहन गेल्यानंतर ‘कंपन’ (व्हायब्रेशन) होत असते. त्यामुळे स्थानिक बोरीच्या नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी अनेकवेळा आवाज उठविला होता. पण, पावसामुळे दुरूस्तीचे काम हाती घेणे शक्य झाले नव्हते. सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्पुरती डागडुजी हाती घेतली होती.

11 ऑक्टोबरपासून काम हाती घेताना पुलाच्या दोन्ही बाजूनी प्रत्येकी 15 मीटर काँक्रिट तोडून, कमानी दुरूस्त केल्या जाणार आहेत. या पुलाच्या तीन कमानी कमकुवत बनलेल्या आहेत. त्या दुरूस्त करून पुन्हा काँक्रीट घातले जाणार आहे. त्यामुळे ज्या बाजूने काम हाती घेतले जाणार आहे. त्या भागावरून होणारी वाहतूक दहा दिवसांसाठी बंद केली जाणार आहे. त्यामुळे पुलावरून एकेरी वाहतूक होईल.

पुलाच्या दोन्ही बाजूनी पोलीस तैनात केले जाणार असून एका बाजूची थोडी वाहने सोडल्यानंतर दुसऱया बाजूची वाहने सोडण्यात येतील. त्यामुळे वाहनांची कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालक तसेच इतर प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

सद्या या पुलावरून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने जात असल्याने, या पुलावर प्रचंड ताण असतो. त्याच बरोबर जुवारी पुलाजवळ वाहनाची कोंडी होत असल्याने अनेक वाहनचालक मडगावहून पणजीला जाण्यासाठी व येण्यासाठी बोरी पुलाचा वापर करीत असतात. या वाहनचालकांनी दुरूस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत जुवारी पुलावरून ये-जा करावी, जेणे करून बोरी पुलावर वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.

Related posts: