|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » साळेल येथील युवकाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत

साळेल येथील युवकाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत 

सत्यमला मारण्याची धमकी दिल्याचा वडिलांचा जबाब

प्रतिनिधी / मालवण:

साळेल जाधववाडी येथील सत्यम नामदेव जाधव (21) याचा मृतदेह कापडी पट्टीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत राहत्या घराच्या बाहेरील खोलीत सोमवारी सकाळी सापडला. सत्यमचा मृतदेह जमिनीपासून पाच फूट उंचीवर लोखंडी शिगेला गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्याने पोलिसांनी त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

सत्यमचा मृतदेह लटकत असल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड केली. त्याची आई बाहेर कपडे धूत होती. त्यानंतर वाडीतील महिलांनी धाव घेत गळफास लावलेली पट्टी कोयत्याने कापली. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी घोषित केले. ग्रामस्थ, मित्रपरिवाराने घटनास्थळी गर्दी केली होती. सत्यम याच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्वात आई, वडील, भाऊ, काका, काकी, चुलत भाऊ, बहीण असा परिवार आहे.

सत्यमला दिली होती धमकी

सत्यमची मालवणातील एका युवतीशी मैत्री होती. रविवारी दुपारी ती युवती साळेलला सत्यमच्या घरी जेवायला आली होती. त्यानंतर सत्यमने तिला चौके येथे नेऊन सोडले होते. रात्री उशिराने युवतीचे नातेवाईक साळेलला येऊन सत्यम याला धमकी देऊन गेल्याचे वडील नामदेव जाधव यांनी पोलीस जबाबात म्हटले आहे. मालवण पोलीस ठाण्याचे हवालदार सुभाष शिवगण, राजन पाटील, विलास टेंबुलकर, हर्षल खडपकर यांनी पंचनामा केला. तपास पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मानसिक दडपणातून आत्महत्या?

सत्यम जाधव हा मनमिळावू स्वभावाचा होता. एका युवतीशी असलेल्या मैत्रीच्या संबंधातून त्याला काहींनी धमकी दिली होती. त्यामुळे त्याने मानसिक दडपणातून अगर आपल्याला मारहाण झाल्यास कुटुंबियांचे काय होईल? या भीतीने आत्महत्या केल्याची चर्चा गावात होती. पोलिसांनी सत्यमला धमकी दिलेल्यांना अगर संबंधित युवतीची चौकशी केल्यास सत्य समोर येईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सत्यमला धमकी कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आली, याचा उलगडा झाल्यास या आत्महत्येचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लवकरच ग्रामस्थ पोलीस निरीक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: