|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विराट जनसमुदायाच्या उपस्थितीत शेखर निकमांचा उमेदवारी अर्ज

विराट जनसमुदायाच्या उपस्थितीत शेखर निकमांचा उमेदवारी अर्ज 

प्रतिनिधी/ चिपळूण

विराट जनसमुदायाच्या साक्षीने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार शेखर निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे दाखल केला. यावेळी आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन घडवत आपली ताकद विरोधकांना दाखवून दिली.

 उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निकम यांनी सकाळी सावर्डे येथे माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या समाधीचे आणि त्यानंतर ग्रामदैवत श्री केदारनाथाचे सहकुटूंब दर्शन घेतले. त्यानंतर चिपळुणात आल्यावर शहराचे श्रद्धास्थान भैरीभवानी ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर बहादूरशेखनाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नगर परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर नगर परिषदेपासून ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहरातून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे दाखल केल्यानंतर निकम यांनी पंचायत समितीजवळ उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी, तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी मला एकवेळ संधी द्या. मतदारसंघाचा निश्चितच कायापालट करून दाखवू, असे आवाहन निकम यांनी दिले.

  यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सभापती पूजा निकम, शौकत मुकादम, सहदेव बेटकर, मिलिंद कापडी, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, इब्राहीम दलवाई यांच्यासह चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

  गर्दीने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

निकम यांची मिरवणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरातून मुंबई-गोवा महामार्गावर आली, त्यावेळी गर्दीने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Related posts: