|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संजू परब तेलींच्या पाठीशी

संजू परब तेलींच्या पाठीशी 

प्रचारात घेतला सहभाग, तेलींचे हात बळकट

प्रतिनिधी / सावंतवाडी:

भाजपाचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी रविवारी भेट घेत त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला. त्यामुळे तेली यांची बाजू अधिक भक्कम झाली आहे. राणे आणि तेली यांच्यात गैरसमजातून वाद निर्माण झाला होता. तो वाद संपला आहे. या निवडणुकीत दीपक केसरकर पुन्हा निवडून येऊ नये, यासाठी तेलींच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन संजू परब यांनी प्रचारात केले.

तेली यांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी माजी खासदार नीलेश राणे यांनी हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी तेली यांना निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. परब यांनी तेलींच्या
प्रचारात सहभाग घेतल्याने सावंतवाडी मतदारसंघात तेलींची बाजू भक्कम झाली आहे. परब सावंतवाडी मतदारसंघात इच्छुक होते. परंतु स्वाभिमान पक्षाचे नीतेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना कणकवलीतून उमेदवारी देण्यात आली. सावंतवाडी मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने परब यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

परब यांनी माजी खासदार नीलेश राणे जेथे असतील तेथे आपण राहणार असल्याचे सांगितले. केसरकर आणि राणे यांचा संघर्ष पाहता नारायण राणे सांवतवाडी मतदारसंघात काय भूमिका घेतात, याची उत्सुकता असतानाच परब यांनी तेली यांची भेट घेऊन प्रचारात सहभाग घेतला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तेली यांनी राणेंशी फारकत घेऊन भाजपमधून सावंतवाडी मतदारसंघात निवडणूक लढविली होती. तेली भाजपमध्येच सक्रीय होते. तर राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. ते भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून खासदार झाले. राणेंचे पुत्र नीलेश राणे यांनी लोकसभा निवडणूक लढविली. परंतु ते पराभूत झाले. तर काँग्रेसचे आमदार असलेल्या नीतेश राणे यांनी अलिकडे आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये
प्रवेश केला. त्यांना कणकवलीतून उमेदवारी देण्यात आली. मात्र, युती असूनही शिवसेनेने राणे यांचे समर्थक असलेल्या सतीश सावंत यांना नीतेश राणेंच्या विरोधात उमेदवारी दिली. त्यामुळे राणे यांनी सावतवाडी आणि कुडाळ मतदारसंघाबाबत भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष परब यांनी अपक्ष निवडणूक लढवित असलेल्या भाजपच्या तेली यांच्या प्रचारात सहभाग घेत त्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. आता तेलींच्या प्रचारात परब यांनी सहभाग घेतल्याने केसरकर यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे.

तेली यांनी गैरसमजातून आरोप-प्रत्यारोप झाले असतील. परंतु स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांशी जुळवून घेऊन काम करणार आहे. केसरकर हे राणे यांच्यामुळे नगराध्यक्ष, आमदार झाले. त्याच राणेंना अडचणीत आणण्याचे काम केसरकर यांनी केले. त्यामुळे केसरकर यांना त्याची जागा दाखवून देऊया, असे आवाहन केले.

Related posts: