|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अग्रणीत बुडून बाप-लेकीचा मृत्यू

अग्रणीत बुडून बाप-लेकीचा मृत्यू 

नदीवरील पुलावरून दुचाकीने जाताना दुर्घटना

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

शनिवारी (ता. 5) रात्री आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडला आणि अग्रणी नदीला पूर आला. या पुरात लेकीसह वडील वाहून गेल्याची दुर्दैवी घटना मोरगावपासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर असलेल्या अग्रणी नदीवर घटना घडली. विशेष म्हणजे बाप, मुलगी आणि पुतण्या पहाटे साडेपाचच्या सुमारास महांकालीच्या आरतीला निघाले होते. नदीवरील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वडील मोटारसायकलसह पार करत असताना मुलीसह मोटारसायकलवरून खाली पडले. त्यात वडील व लेक वाहून जात होते. त्यातील एकाला पोहण्याचा सराव असल्यामुळे तो पोहत अग्रणी काठावर आला. घटनेने देशिंगच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांतील ही दुर्दैवी घटना असून कवठेमहांकाळजवळील अग्रणी नदीला पूर येणे ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. तब्बल दहा ते अकरा तासांच्या प्रयत्नानंतर योगेश पवार यांचा मृतदेह सापडला. दरम्यान रविवारी (ता. 6) रात्री नदीच्या पात्रात बोटी साहाय्याने मुलगी श्रेया हिचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते.

   शनिवारी (ता. 5) दिवसभर उकाडा होता. रात्री नऊपर्यंत आकाश भरून आले होते. दहा वाजता हळूहळू पावसाने सुरुवात केली. पहाटे तीनपर्यंत आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडला. मोठा पाऊस झाल्याने अग्रणी नदी तुडूंब भरून वाहू लागली. मोरगाव येथील योगेश पवार आणि त्यांची आठ वर्षाची मुलगी श्रेया व ओंकार हे कवठेमहांकाळ महांकालीच्या आरतीसाठी घरातून साडेपाच वाजता मोटारसायकलवरून निघाले होते. मोरगावजवळील अग्रण नदीवरील पूल पाण्याने दुथडी भरून वाहत होता. इतकेच काय या पुलावर जवळजवळ पाच-सहा फूट पाणी होते. योगेशला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मोटारसायकल पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मोटारसायकल पाण्यात पडली. पाण्यात पडल्यानंतर श्रेया वाहून जात होती. लेकीला वाचण्यासाठी योगेश पाण्यात पोहत गेले. मात्र लेकीसह योगेश वाहून गेले होते. वडील योगेश पवार यांचा मृतदेह सायंकाळच्या सुमारास सापडला. मोटारसायकलवर बसलेला ओंकारला पोहता येत होते. त्यांने पोहून अग्रणी पार केली.

भयभीत झालेल्या ओंकारने अगदीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरगाव गावातील मंडळींना हे सांगितले. ग्रामस्थ सहाच्या दरम्यान नदीवर आले. अग्रणी नदीपासून अगदी धुळगावच्या बंदरापर्यंत दोन्ही बाजूला योगेश आणि श्रेया कुठे कडेला बाजूला पडले आहेत का पाहिले. मात्र हे दोघेही ही सापडले नाहीत.

घटनास्थळाला तहसीलदार गोरे, पोलीस आणि नागरिक होतेच. योगेश आणि त्यांची मुलगी श्रेया ही सापडत नाहीत म्हणून अखेर सांगलीहून बोट मागण्यात आली. बोटीने बापलेकीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नदीवरील पुरात वाहून गेलेली योगेश पवार (वय 38) हे इलेक्ट्रिक मोटार बांधणीचा व्यवसाय करीत होते. दररोज कवठेमहांकाळ ते मोरगाव असा प्रवास करत होते. त्यांना श्रेया वय वर्षे आठ आणि लहान मुलगा आहे. आता योगेश पुरात वाहून गेल्याने त्यांचा संसार उघडय़ावर पडला आहे. वाहून गेल्याची घटना समजताच त्यांच्या पत्नीवर दुःखाचे आभाळ कोसळले आहे.