|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » रोगनिवारण

रोगनिवारण 

मध्यंतरी सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली. पुणेकरांसाठी होती. स्वारगेट हा पुण्याच्या दक्षिणेकडचा भाग. इथून दक्षिण महाराष्ट्राकडे व पुढे जाणाऱया बसेस सुटतात. जाहिरात अशी होती की स्वारगेट परिसरात राहणाऱया 10 पैकी 4 लोकांना मधुमेह असू शकतो. तुम्ही इथे रहात असाल तर ताबडतोब आमच्याकडे तपासणी करायला (आणि गरज पडल्यास नंतर उपचारांसाठी) या.

अमुक परिसरात राहिल्यावर मधुमेह कसा होईल? समजा मी तिथे रहात असेन आणि मधुमेही असेन तर मी पोटभर गोडाधोडाचं जेवून अन्य परिसरात रहायला गेलो तर चालेल? पुण्यातच एका दिवंगत स्वामींच्या आश्रमाबाहेर पाटी आहे की पृथ्वीवरचे एकमेव एड्समुक्त ठिकाण. कारण एड्सविषयक चाचणी घेतल्याशिवाय आश्रमात सोडतच नाहीत. एड्स झालेला रुग्ण आश्रमात रहायला गेला तर पाटीवरील मजकुरामुळे तो आपोआप बरा होईल? की पाटीवरचा मजकूर आपोआप अदृश्य होईल? 

आकर्षक जाहिराती आणि व्यवसायवृद्धी करण्याचा सर्वांना हक्क आहे. फक्त थापेबाजी नको. एखाद्या परिसरात रेड लाईट एरिया असेल तर तिथे देखील  एखाद्याने डायग्नोस्टिक सेंटर काढून ‘इथे राहणाऱया 10 पैकी 8 जणांना एड्स असू शकतो, आमच्याकडे तपासणीला या,’ अशी जाहिरात करणे किंवा एखाद्या भागातल्या स्थानिक कररचनेमुळे मद्य स्वस्त असेल तर, तिथे डायग्नोस्टिक सेंटर काढून ‘इथे राहणाऱया अमुकपैकी तमुक लोकांना लिव्हरचे विकार असू शकतात, आमच्याकडे तपासणीला या,’ अशा जाहिराती करणे शक्मय आहे. 

आयुर्वेदावर रुग्णांचा विश्वास असल्यामुळे अनेक भोंदू लोक वैद्य-डॉक्टर असल्याचे भासवून गैरफायदा घेतात. मधुमेही रुग्णांना जिवंत मासा गिळायला सांगतात, विडय़ाच्या पानात ढेकूण खायला घालतात. ऑपरेशन न करता झिजलेला गुडघा पूर्ववत करण्याच्या वल्गना करतात. रुग्ण फसतात. आर्थिकदृष्टय़ा आणि आरोग्यदृष्टय़ा देखील.हल्ली विकासासाठी म्हणून बरीच वृक्षतोड होत असते. वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात. उद्या अशी देखील जाहिरात पहायला मिळू शकेल-

तुमच्या भागात वृक्षतोड झाली आहे काय? शुद्ध हवेची टंचाई भासते आहे काय? भिऊ नका.  हैड्रोजनचे दोन आणि प्राणवायूचा एक अणू मिळून पाणी बनते. आमच्याकडचा आयुर्वेदिक खलबत्ता घ्या.  रोज सकाळी त्यात चमचाभर पाणी घेऊन कडक उन्हात बसून कुटून काढा. पाणी कुटल्यावर त्यातला प्राणवायू आसपास पसरून तुमचे घर आरोग्यदायी बनेल.