|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आटपाडीत 12 लाखांची रोकड लंपास

आटपाडीत 12 लाखांची रोकड लंपास 

दिवसाढवळय़ा प्रकार घडल्याने खळबळ : काठीने हल्ला करून बॅग लिफ्टींग

प्रतिनिधी/ आटपाडी

आटपाडीतून विविध वित्तीय संस्थांमधून संकलित होणारी दैनंदिन रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी नेत असताना अज्ञातांनी काठीने हल्ला करून तब्बल 12 लाखांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी भर दुपारी आटपाडी-भिंगेवाडी दरम्यान घडली. बॅग लिफ्टींगच्या या घटनेने शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी विविध पथकांव्दारे चोरटय़ांचा तपास सुरू केला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आटपाडी येथे टेलरिंग व्यवसायासह एका खासगी सिक्युरिटीच्या कॅश लिफ्टींगचे काम करणारे मोहन शिंदे हे विमा कंपनीसह अन्य वित्तीय संस्थांच्या रकमा दररोज संकलित करून त्या करगणीतील एका बँकेत भरण्यासाठी नेत असते. हे काम ते आपल्या दुचाकीवरूनच करत होते. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी विविध ठिकाणावरून सुमारे 11 लाख 62हजार इतकी रक्कम जमा करून ती करगणीतील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत भरणा करण्यासाठी निघाले.

सदरचे पैसे घेऊन ते प्रारंभी आपल्या मळय़ातील घराकडे गेले. त्यानंतर ते मुख्य रस्त्याने करगणीला जाण्यासाठी निघाले. पण, घरापासून काही अंतर पुढे आल्यानंतर वाटे कडेला एका काळय़ा रंगांची पल्सर घेऊन दोघे उभे होते. मोहन शिंदे यांची दुचाकीजवळ येताच त्यातील एकाने काठीने चालत्या गाडीवरील शिंदे यांच्यावर हल्ला केला. यात हाताला मार लागून ते खाली पडले. त्याचवेळी शिंदे यांच्याकडील सुमारे 12 लाखांची बॅग घेऊन पल्सरवरून त्या दोघांनी करगणीच्या दिशेने पोबारा केला.

या घटनेने भेदरलेल्या मोहन शिंदे यांनी आटपाडी पोलीस ठाणे गाठून घडला घटनाक्रम सांगितला. पोलिसांनीही तात्काळ विविध पथकै आटपाडी तालुक्य़ाच्या कानाकोपऱयात पाठविली. शिंदे याला घेऊन पोलिसांनी चोरटय़ांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. पण, रात्री उशीरापर्यंत काहीही हाती लागले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षकांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आटपाडीतील घटनास्थळी धाव घेतली.

विमा कंपनीच्या कार्यालयासह मोहन शिंदे सांगत असलेल्या ठिकाणांचाही पोलिसांनी ठाव घेतला. विविध शक्यता पडताळून पोलीस तपास करत असून यापूर्वी वाटमारी केलेल्या तालुक्यातील काही चोरटय़ांसह जिल्हय़ातील आरोपींचीही पडताळणी सुरू आहे. तब्बल 12 लाख रूपयांच्या बॅग लिफ्टींगच्या प्रकाराने आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ माजली असून इतकी मोठी रक्कम ने-आण करण्याच्या कामात सुरक्षेची काळजी कशी घेतली गेली नाही? असा सवाल आणि शंका निर्माण झाली असून पोलीस चोरटय़ांचा तपास करत आहे.

 

Related posts: