|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बंडोबांचे वादळ शमवले

बंडोबांचे वादळ शमवले 

पुरुषोत्तम जाधव, रणतिसिंह भोसले, अनिल देसाईंसह 35 जणांची माघार

प्रतिनिधी/ सातारा

सातारच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीकरताही दाखल झालेल्या अर्जामध्ये पुरुषोत्तम जाधव यांनी आपला अर्ज दाखल केल्याने उत्सुक्ता लागून राहिली होती. त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने त्यांनी दोन्ही ठिकाणचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात 7 उमेदवार राहिले असले तरीही प्रमुख लढत ही राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आणि भाजपाचे उदयनराजे यांच्यात होणार आहे. आठही विधानसभा मतदार संघातून दाखल झालेल्या अर्जांपैकी 35 जणांनी माघार घेतली असून आता निवडणुकीच्या रिंगणात 73 जण उरले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत. मतदार राजा मात्र कोणाला कौल देणार हे होणाऱया प्रचारावरुन दिसणार आहे. कोरेगाव मतदार संघात सेनेचे बंडखोर रणजितसिंह भोसले यांनी माघार घेतली आहे. तसेच माण-खटावमधून आमचं ठरलंय टीमने एकमुखी प्रभाकर देशमुख यांचा अर्ज ठेवत बाकीच्या उमेदवारांनी माघार घेतली. त्याचबरोबर कराड उत्तर मतदार संघ सेनेला गेल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या मनोज घोरपडे यांनी आपला उमेदवारी अर्ज ठेवल्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.

  सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीला सेनेचे पुरुषोत्तम जाधव यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केल्याने मोठे ट्विस्ट निर्माण झाले होते. त्यांनी अर्ज तसाच ठेवला तर तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यांना आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन कडक शब्दात सूचना दिल्या. त्यामुळे त्यांनीही आपला स्वीय सहाय्यक मंगेश गुरव वेळेत पाठवून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडून आपला अर्ज मागे घेतला. मंगेश गुरव यांच्यासमवेत उदयनराजेंचे सुनील काटकर, जितेंद्र खानविलकर हेही दिसत होते. तर त्यांनी वाईतूनही मदनदादांच्या विरोधातील आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे तेथेही आता भाजपाचे मदन भोसले आणि राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांच्यातच लढत होणार आहे.

  लोकसभेच्या रिंगणात आता श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले, चंद्रकांत खंडाईत, दीपक महास्वामी, शिवाजी जाधव, शिवाजी भोसले आणि अलंकृता आवाडे-बिचुकले असे सात उमेदवार रिंगणात असून त्यांना त्यांचे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

  सातारा विधानसभेलाही दाखल झालेल्या अर्जापैकी वेदांतिकाराजे यांनी आणि शिवेंद्रराजेंच्याकरता सागर भिसे यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. दुपारी 12 वाजता त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे तसा अर्ज केला. त्यांनी सुरुची बंगला येथे जावून आमदार शिवेंद्रराजे यांच्याकरता अर्ज मागे घेतल्याचे जाहीर करत साताऱयाच्या विकासाकरता मी माझा अर्ज मागे घेतल्याचे सागितले. आमदार शिवेंद्रराजे यांनीही त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

  दरम्यान, कोरेगावातूनही महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या विरोधात बंड केलेले युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. त्यांनी सेनेचेच काम करणार असल्याचे जाहीर केले.

  दरम्यान, माण-खटाव मतदार संघातूनही आपलं ठरलंया या टीममधून अगोदर अनिल देसाईंचे नाव घेण्यात आले होते. अर्जही भरण्यात आला होता. परंतु शरद पवारांच्या सूचनेनुसार प्रभाकर देशमुख यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचाच अर्ज ठेवण्यात आला. बाकी संदीप मांडवे, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख यांचे अर्ज काढून घेण्यात आले. त्यामुळे तेथेही भाजपाचे उमेदवार जयकुमार गोरे विरुद्ध सेनेचे उमेदवार शेखर गोरे आणि आमचं ठरलयंचे प्रभाकर देशमुख यांच्यात लढत होणार आहे.

तसेच कराड उत्तर हा मतदार संघ भाजपला जाईल असा अंदाज होता. त्यामुळे मनोज घोरपडे यांनी तयारी केली होती. परंतु ऐनवेळी मतदार संघ सेनेला गेल्यामुळे धैर्यशील कदम यांनी शिवबंधन बांधत सेनेतून उमेदवारी मिळवली. त्यामुळे नाराज झालेल्या मनोज घोरपडेंनी बंडखोरी केली. त्यांचा अर्ज माघारी घेतला जाईल, असे वाटत असताना त्यांनी अर्ज ठेवल्याने आता मतदार संघात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

आता जिह्यातील सर्वच मतदार संघात अंतिम चित्र स्पष्ट झाले असून उमेदवारांना निवडणुकीचे चिन्ह मिळाले आहे. प्रचारालाही प्रारंभ केला आहे.

 

Related posts: