|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन 

राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

प्रतिनिधी/ मुंबई

आविष्कार संस्थेचे आधारवड आणि प्रायोगिक रंगभूमीची तळमळ असणारे कार्यकर्ते अशी ओळख असलेले ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे बुधवारी 9 रोजी राहत्या घरी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘आविष्कार’ ही नाटय़संस्था अरुण काकडे यांच्यामुळे अतिशय भक्कमपणे उभी राहिली. प्रायोगिक रंगभूमीबद्दल त्यांना विशेष तळमळ होती. प्रायोगिक नाटकांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी गेली सात दशके ते झटत राहिले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवर मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे. नव्या कलाकारांना नेहमी प्रोत्साहन देणारे अरुण काकडे हे ‘काकडेकाका’ नावे प्रसिद्ध होते. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. 94 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सतत नवनिर्मितीचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यामुळेच 12 महिन्यात 12 नाटकांची निर्मिती त्यांनी केली. मराठी रंगभूमीबद्दल ते नेहमीच आशावादी होते. ते नेहमी नव्या कलाकारांना प्रोत्साहन देत असत.

पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये शिकत असताना भालबा केळकर हे त्यांना गुरू त्यांना लाभले. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काकडे यांनी रंगभूमीचे धडे घेतले. ‘भ्रमाचा भोपळा’ हे त्यांचे पहिले नाटक. या नाटकात त्यांनी अभिनय केला होता. मात्र, अभिनयापेक्षा त्यांनी पडद्यामागे राहून काम करणे अधिक पसंत केले.