|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला संघाचा आफ्रिकेवर 8 गडय़ांनी विजय

भारतीय महिला संघाचा आफ्रिकेवर 8 गडय़ांनी विजय 

पदार्पणातच प्रिया पुनियाची अर्धशतकी खेळी, जेमिमाचेही अर्धशतक, तीन सामन्यांच्या मालिकेत  1-0 ने आघाडी

वृत्तसंस्था/ वडोदरा

भारतीय महिला संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर 8 गडी राखून सहज विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱयापुढे आफ्रिकेच्या संघाचा डाव 164 धावांवर आटोपला. यानंतर प्रिया पुनिया (नाबाद 75) व मुंबईची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज (55) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने विजयी लक्ष्य दोन गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण केले. आता, उभय संघातील दुसरा सामना शुक्रवारी वडोदरा येथेच खेळवण्यात येईल.

प्रारंभी, आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झुलन गोस्वामी (33 धावांत 3 बळी) व शिखा पांडे, एकता बिश्त, पूनम यादव (प्रत्येकी 2 बळी) यांच्या भेदक माऱयासमोर आफ्रिका संघाचा डाव 45.1 षटकांत 164 धावांत आटोपला. मॅरिझॅन कॅपने सर्वाधिक 54 धावा करत काही काळ झुंज दिली. पण इतर फलंदाजांची तिला अपेक्षित साथ मिळाली नाही. लॉरा वॉल्रवॉटने 39 तर कर्णधार सुन ल्युसने 22 धावांचे योगदान दिले.

प्रिया-जेमिमाची शानदार अर्धशतके

आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. एकदिवसीय कारकिर्दीत पदार्पण करणाऱया प्रिया पुनियाने शानदार खेळी साकारताना नाबाद 75 धावा केल्या. तिला जेमिमा रॉड्रीग्जने 65 चेंडूत 7 चौकारासह 55 धावा करत चांगली साथ दिली. पण अर्धशतक झाल्यावर ती लगेच बाद झाली. पण प्रियाने पुढे कर्णधार मिताली राज (नाबाद 11) सोबतीला घेत 41.4 षटकांत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्याच सामन्यात विजयी खेळी करणाऱया प्रियाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : आफ्रिका महिला संघ 45.1 षटकांत सर्वबाद 164 (मॅरिजन कॅप 54, लॉरा 39, सुन ल्युस 22, झुलन गोस्वामी 3/33, शिखा पांडे 2/38, एकता बिश्त 2/28, पूनम यादव 2/33).

भारतीय महिला संघ 41.4 षटकांत 2 बाद 165 (प्रिया पुनिया नाबाद 75, जेमिमा रॉड्रिग्ज 55, पूनम राऊत 16, मिताली राज नाबाद 11, डी क्लर्क 1/29, शांगसे 1/39).

मितालीने रचला नवा इतिहास,

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्षे खेळणारी पहिली भारतीय खेळाडू बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्षे प्रतिनिधित्व करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू तर सचिन तेंडुलकरनंतर दुसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. 26 जून 1999 मध्ये पहिला वनडे सामना खेळणाऱया मितालीने तब्बल 20 वर्षे 105 दिवस भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिले आहे. 36 वर्षीय या भारतीय महिला खेळाडूने 10 कसोटी तसेच 89 टी-20 सामने खेळले आहे. गतवर्षी तिने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती स्वीकारली होती.

 प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडू

  1. सचिन तेंडुलकर – 22 वर्षे 91 दिवस
  2. सनय जयसुर्या – 21 वर्षे 184 दिवस
  3. जावेद मियाँदाद – 20 वर्षे 272 दिवस
  4. मिताली राज – 20 वर्षे 105 दिवस.

 

Related posts: