|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डॉ. अर्जुन चव्हाण यांना ‘हिंदी सेवा सन्मान’ पुरस्कार

डॉ. अर्जुन चव्हाण यांना ‘हिंदी सेवा सन्मान’ पुरस्कार 

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले डॉ. चव्हाण यांचे अभिनंदन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाचे डॉ. अर्जुन चव्हाण यांना नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलनामध्ये ‘हिंदी सेवा सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. चव्हाण यांचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी. एस. पाटणकर यांनी अभिनंदन केले.

महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त विश्व हिंदी परिषद, दिल्ली व राजभाषा विभाग, भारत सरकार यांच्या वतीने नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी लेखिका व गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते झाले. या संमेलनात हिंदी साहित्यात केलेले भरीव लेखन व हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मॉरिशस, श्रीलंका, इंडोनेशिया, नेपाळ, दक्षिण आफ्रिका या देशांसह भारतातील निवडक हिंदी साहित्यिकांचा ‘हिंदी सेवा सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. चव्हाण यांचा समावेश होता. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी या संमेलनात “गांधी और राष्ट्रभाषा हिंदी’’ या विषयावर मार्गदर्शन केले. “बहुआयामी गांधी: विविध परिदृश्य’’ हा या संमेलनाचा मुख्य विषय होता.  डॉ. चव्हाण यांना यापूर्वी ‘हिंदी साहित्य अकादमी, मॉरिशस सन्मान, ‘साहित्य शिरोमणी सन्मान’, ‘भारतेन्दु भूषण सन्मान’ व ‘युवा प्रेरक मार्गदर्शक सन्मान’ यांसारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना ‘अनुवाद चिंतन’ या ग्रंथासाठी ‘हिंदी साहित्य अकादमी’ (मुंबई) सन्मान’ व ‘सुब्रमण्य भारती साहित्य सेतु, जीवन गौरव सन्मान’ तसेच ‘अनुवाद समस्याएँ एवं समाधान’ या ग्रंथासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते ‘अहिंदी भाषी हिंदी लेखक राष्ट्रीय सन्मान’ देऊन गौरविले आहे. यावेळी विश्व हिंदी परिषदेचे महासचिव डॉ. विपिन कुमार, संयोजक प्रा. डॉ. माला मिश्र, राजभाषा विभाग आणि दिल्ली महानगर पालिकेच्या आयुक्त रश्मी सिंह आदी उपस्थित होते.

 

Related posts: