|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राज्यातील जनतेला पुढे नेण्याचे स्वप्न

राज्यातील जनतेला पुढे नेण्याचे स्वप्न 

शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

लोकसभा निवडणुकीत देश भगवा केला आहे. आता गाव, शहर आणि राज्य भगवे करायचे आहे. यासाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहन करत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राला पुढे न्यायचे असल्याचे सांगितले. राज्यातील जनतेला पुढे नेण्याचे स्वप्न आम्ही पाहत आहोत. त्यासाठी शिवसेना, महायुतीला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. गडहिंग्लज येथील म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर बुधवारी दुपारी शिवसेनेची प्रचारसभा पार पडली.

युवा प्रमुख ठाकरे यांचे जोरदार स्वागत करत त्यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंदगड मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर, कागल मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजयबाबा घाटगे यांची मनोगते झाली. खासदार संजय मंडलिक यांनी लोकसभेप्रमाणे यावेळीही विधानसभेला जनतेने शिवसेनेला कौल देत या भागातील दोन्ही जागेवर भगवा फडकवा, असे आवाहन केले.

वरळी-शिवडी मतदारसंघाप्रमाणे कोल्हापूर जिल्हय़ावर माझे पेम आहे. सत्ता आल्यानंतर वरळीला कोल्हापूर भवन उभारणार असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरकस टिका केली. त्यांच्या कारकिर्दीत राज्याचा विकास खुंटला होता. या विकासाला युती सरकारने गेल्या पाच वर्षात गती दिली असून  राज्याला विकासात पुढे घेऊन जायचे आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेनेला साऱयांनी साथ द्यावी, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकऱयांचा 7/12 कोरा करणार असून प्रत्येक वर्षी शेतकऱयाला 10 हजार देणार असल्याचे सांगितले. 10 रु. ला जेवण देण्याचे आश्वासन देत महिलांना पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे. आपले विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासक्रम बदलणार असून प्रत्येक शालेय विद्यार्थ्याच्या दारात एस. टी. ची सोय केली जाणार आहे. प्रत्येक जिल्हय़ाला वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे करण्याचा मानस असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, विरेंद्र मंडलिक, सुनिल शिंत्रे, दिलीप माने, उत्तम कांबळे, मनोज पोवार यांच्यासह कागल, चंदगड मतदारसंघातील महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी, मतदार उपस्थित होते.

 

Related posts: