सांगलीत महाविद्यालयीन युवकाला भोसकले

तीन संशयितांची नावे निष्पन्न : धारदार शस्त्राचा वापर
प्रतिनिधी/ सांगली
येथील सांगली-मिरज रस्त्यावरील विलींग्डन महाविद्यालयाच्या आवारातच एका विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. निरंजन संजय मोरे (वय 17 रा. शिपूर, ता. मिरज, जि. सांगली) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या पोट व पाठीवर वार झाले आहेत. भर दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी अवस्थेत त्याला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विश्रामबाग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी तीन हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. प्रेम भोसले, सोन्या पाटील व सुर्याजी गायकवाड (स्फूर्ती चौक, विश्रामबाग, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, की जखमी निरंजन सांगली-मिरज रस्त्यावरील विलींग्डन महाविद्यालयात शिकतो. बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाच्या जिमखान्याजवळ उभा होता. त्यावेळी संशयितानी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्याच्या पोट व पाठीवर वार केले. यामध्ये निरंजन जखमी झाला.
भर दुपारी महाविद्यालयाच्या आवारातच घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली. हल्ला केल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला. जखमी निरंजनला त्याला भाऊ प्रांजल मोरेने तात्काळ येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विश्रामबाग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नाही. दरम्यान किरकोळ कारणावरुन हा हल्ला झाल्याची चर्चा सुरु होती. रात्री उशिरापर्यंत संशयितांना अटक करण्यात आलेली नव्हती.
Related posts:
कुपवाड-सुतगिरणी निकृष्ट डांबरीकरणाचे काम थांबवा
अखेर 57 मोबाईल टॉवर सिल,3.89कोटींची घरपट्टी थकीत
जिह्यातील शेतकऱयांना मिळणार 350 कोटीहून अधिक कर्जमाफी
सांगलीच्या हळदीला भौतिक संपदेचा दर्जा