|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पहिला कॅसिनो हलविण्याची प्रक्रिया सुरु

पहिला कॅसिनो हलविण्याची प्रक्रिया सुरु 

विजय सरदेसाई सोबत राजकीय चर्चा नाहीः लोबो

प्रतिनिधी/ पणजी

मांडवीतील एक कॅसिनो अन्यत्र हलविण्याची प्रक्रिया सरकारने सुरु केली आहे. तो कॅसिनो हलविण्यास मालकानेही मान्यता दिलेली आहे. जागाही जवळजवळ निश्चित करण्यात आलेली आहे. समुद्र हा समुद्र असतो तो कोणत्याही मतदारसंघाच्या कक्षेत येत नाही, असे गृहनिर्माण खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊनच कॅसिनो हलविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. कॅसिनो धोरण तयार व्हायला हवे असे मुख्यमंत्र्यांना सांगितलेले आहे. मुख्यमंत्रीही त्याच मताचे आहेत. त्यांनाही कॅसिनो धोरण तयार झालेले हवे आहे. अखेर हे सर्व कॅसिनो समुद्रातून जमिनीवर आणायचे आहेत. मोपा विमानतळाचे काम सुरु व्हायला हवे. तेव्हाच धोरण तयार करणे शक्य होणार आहे. विमानतळ तयार झाल्यानंतर तिथे विमाने दाखल होणार व पर्यटक येणार हे स्पष्ट व्हायला हवे. तेव्हाच कॅसिनो धोरण तयार करणे शक्य होणार आहे. कॅसिनो धोरण जाहीर होताच कॅसिनोना तिथे पुनर्स्थापित करणे शक्य होणार आहे असेही ते म्हणाले.

सरदेसाईसोबत कोणतीच राजकीय चर्चा नाही

आमदार विजय सरदेसाई यांच्या निमंत्रणानुसार त्यांच्यासोबत बसण्याची तयारी लोबो यांनी व्यक्त केली. सोनसडा कचरा प्रकल्पातून सरदेसाई यांनी लोबो यांच्यावर टीका केली होती. त्याला अनुसरुन ते बोलत होते. सरदेसाई हे आपल्यावर नाराज आहेत. सध्या ते आपल्याला ‘ड्रींकसाठी’ बोलावतात. विजय सरदेसाई सोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. विजय यांचे केंद्रातील नेत्यांकडे संबंध आहेत. दिल्लीतील नेते आणि गोवा फॉरवर्डने यानाच काय तो निर्णय घेऊ दे आपण खूप लहान नेता आहे. सरदेसाई याअगोदरही केंद्रातील नेत्याशीच बोलत होते असेही ते म्हणाले.