|Friday, October 18, 2019
You are here: Home » विविधा » कर्तृत्वाने हटके असणा-यांसाठी ‘सन्मान चारचौघींचा’

कर्तृत्वाने हटके असणा-यांसाठी ‘सन्मान चारचौघींचा’ 

पुणे / प्रतिनिधी :

आपल्या संस्कृतीमधील सण-उत्सवांचे मर्म जाणून हे उत्सव पुढे नेण्याकरीता झटणा-या महिलांचा सन्मान पुण्यामध्ये करण्यात आला. सामान्य चारचौघी महिलांप्रमाणे प्रापंचिक पण कर्तृत्वाने हटके असणा-या चार महिलांच्या कार्याची दखल एका गणेशोत्सव मंडळाने घेतली आणि नवरात्रीच्यानिमित्ताने त्यांचा गौरव केला. पुरुषांप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात महिलाही आघाडीवर आहेत, हे वाक्य सार्थ करणा-या या महिलांच्या कार्याला उपस्थितांनी देखील टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली. 

निमित्त होते, शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मंडळाच्या चौकात झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या चार महिलांच्या सन्मान सोहळ्याचे. यावेळी शनिवार पेठ मेहुणपुरा मंडळाच्या भावना शिंदे, पर्णल ठाकूर, नेहा पंडित, पिंकी भगत, सविता पंडित, देविका कावणकर आदी उपस्थित होते. 
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीच्या सांगता मिरवणुकीच्या नेत्रदीपक रथाच्या रोषणाईचे तांत्रिक नियोजन करणा-या शुभांगी वाईकर, वडिलांचा वारसा जपताना मंडई गणपतीच्या मूर्तीचे सलग अठरा वर्षे रंगकाम करणा-या संगीता वेदपाठक, अपंगांच्या क्षेत्रात समुपदेशनाचे कार्य करणा-या सुरेखा पंडित आणि वडिलांच्या साथीने पारंपरिक नगारावादनाची कला जोपासणारी निकीता लोणकर या चार महिलांना सन्मानित करण्यात आले. उपरणे, मानपत्र व श्रीफळ असे सन्मानाचे स्वरुप होते. आर्या ठाकूर हिने सूत्रसंचालन केले. पर्णल ठाकूर यांनी आभार मानले.