|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महायुती पुन्हा सत्तेवर येणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

महायुती पुन्हा सत्तेवर येणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

कोल्हापूर : प्रतिनिधी

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाभाजपा आणि मित्रपक्ष महायुतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षात अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवरील महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार आहे. अखंड भारताचे भाजपा चे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 रद्द करून अखंड भारताचे स्वप्न साकार केले. काश्मीर भारतात येत असताना, विरोधकांना वाईट का वाटावे, संसदेत विरोधकांनी विरोध का केला? असा प्रश्न ही केला. यावेळी राफेल विमानाच्या पूजनासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, दसर्‍यादिवशी शस्त्र पूजन केले जाते, त्याप्रमाणे राफेलचे पूजन केले त्यात वावगे काय? अशी विचारणा करून या घटनेचे समर्थन करता असल्याचे सांगितले.

सावंत यांनी कोल्हापुरातील स्थानिक आमदार अमल महाडिक यांच्या कामाचे कौतुक केले. कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी भरघोस निधी आणला, यामुळे कोल्हापूरची इतर शहराशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढली आहे. सिपीआरसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. काँग्रेसराष्ट्रवादी आघाडीने पंधरा वर्षात काहीच केले नाही. मात्र युती सरकारने गेल्या पाच वर्षात काय केले हे लोकांसमोर आहे. यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार महाडिक म्हणाले, शिवडाव सोनवडे या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून, लवकरच तो रस्ता पूर्ण होईल, असे सांगितले.
या पत्रकार परिषदेला महासंघटनमंत्री बाबा देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

चुलत्याला हरविले, पुतण्याला हरवायला कठीण नाही

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 2014 च्या निवडणुकीत आमदार अमल महाडिक यांनी माजी गृह राज्यमंत्री आणि आताचे अमल महाडिक यांचे प्रतिस्पर्धी ऋतुराज पाटील यांचे चुलते सतेज पाटील यांना हरविले आहे. त्यामुळे आता पुतण्याला हरविणे कठिण नाही, असा टोला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लगावला.

Related posts: