|Friday, October 18, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » दिव्यांग व्यक्तींच्या विशेष कलात्मक वस्तूंचे ‘प्रोत्साहन’ प्रदर्शन १५ ऑक्टोबर पासून

दिव्यांग व्यक्तींच्या विशेष कलात्मक वस्तूंचे ‘प्रोत्साहन’ प्रदर्शन १५ ऑक्टोबर पासून 

पुणे / प्रतिनिधी : 
विशेष व्यक्तींना मदत करण्याबरोबरच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी काम करणा-या पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येत प्रोत्साहन प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणाºया संस्था व सामान्य नागरिक यांच्यात परस्पर-संवाद आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी  १५ आणि  १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत एरंडवण्यातील मनोहर मंगल कार्यालयात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील दिव्यांग व्यक्ती आणि संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य खुला आहे,अशी माहिती संस्थेच्या रेखा कानिटकर यांनी दिली. 
रंजना आठल्ये, आरती पटवर्धन, गीता पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उपक्रमांंतर्गत विशेष व्यक्तींनी बनविलेल्या कलात्मक व उपयुक्त वस्तू तसेच खाद्यपदार्थ प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक १५ रोजी सकाळी १० वाजता अ‍ॅबिलिंपिक्सच्या नॅशनल सेक्रेटरी आणि अभिसारच्या अध्यक्षा मिनिता पाटील व आयआयजी ट्रस्टचे संस्थापक सागर पाटील (दृष्टीहिन) यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्यावेळी तनया बर्वे (गतिमंद)  गणेश वंदना आणि ज्येष्ठ कलाकार रमेश गुलाणी (दृष्टीहिन) बासरी वादन सादर करणार आहे 
रंजना आठल्ये म्हणाल्या, यंदा प्रदर्शनात ५० स्टॉल असणार आहेत. तसेच १५ संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत. साई गुरु संस्थेतील दृष्टीहिन मुली विविध वस्तू तयार करण्याचे प्रात्याक्षिक सादर करणार आहे. धायरी येथील अंध वृद्धाश्रमातील महिला वायरचे बास्केट, मण्यांचे शोपीस तयार  करण्याचे प्रात्याक्षिक सादर करणार आहेत. तसेच अश्विनी पाटील यांच्या अंतर्नाद क्लिनीक मधील विशेष मुले नृत्य सादर करणार आहेत. 
प्रदर्शनात शिर्डी साईबाबा अंध वृद्ध महिलाश्रम, जीवन ज्योत शेल्टर्ड वर्कशॉप, हॅन्डीकॅप असोसिएशन पंढरपूर, संवाद लोणावळा तसेच अपंगत्वावर मात करुन आकर्षक कलावस्तू तयार करणाºया १८ ते ८० वयोगटातील ३५ जण वैयक्तिकरीत्या सहभागी होणार आहेत. समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन २००३ पासून हा उपक्रम हाती घेतला आहे. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. यंदा प्रदर्शनाचे १७ वे वर्ष आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन विशेष व्यक्तींना प्रोत्साहित करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.