|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews » हे तर निर्दयी सरकार : आरेप्रश्नी राज ठाकरेंनी फटकारले

हे तर निर्दयी सरकार : आरेप्रश्नी राज ठाकरेंनी फटकारले 

ऑनलाईन टीम  / भांडूप : 

दरवर्षी या निवडणुका होत असतात, मतदानाचा दिवस येतो आणि ते झाले की पुढची 5 वर्षे तुम्ही जिवंत आहात की नाही याचे कुणाला काही पडलेले नसते. केवळ मजाच सुरू आहे, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी भांडूप येथील प्रचारसभेत केले. नादान सरकारने 2700 झाडे एका रात्रीत कापली. असा जुलमी कारभार व निर्दयी निर्णय घेताना त्याला विरोध करणारा सक्षम विरोधी पक्ष हवा. त्यासाठी मनसेला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

राज म्हणाले, निवडणुका म्हणजे फक्त मजा चालू आहे. प्रत्येक पक्ष जाहीरनामा काढतात, मात्र पुढे त्याचे काय होते, हे कोणी विचारत नाही. तुम्ही लोक पण विसरून जाता. 5 वर्षापूर्वी कोणत्या गोष्टी सांगितल्या?, त्या झाल्या की नाही याबद्दल कोणालाही काही माहीत नाही. आपल्याला राग येत नाही.

भाजप-शिवसेना युतीने गेल्या 5 वर्षात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? भाजप सरकारच्या काळात 14 हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्या, महाराष्ट्रावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले, रस्त्यांची अवस्था बिकट आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच आहेत. पण का? कारण त्यांनी काही केले नाही. मात्र, आपण त्यांना त्याचा जाब विचारत नाही. महाराष्ट्र हतबल झाला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.