|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहरातील एक हजार 700 गुंडांवर प्रतिबंधक कारवाई

शहरातील एक हजार 700 गुंडांवर प्रतिबंधक कारवाई 

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची माहिती

प्रतिनिधी/  सोलापूर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिनही मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी म्हणून विशेष मोहिम राबवून गंभीर गुह्यातील सुमारे 1 हजार 700 गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.

पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त डोंगरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, निवडणूक शाखेचे हेमंत शेंडगे उपस्थित होते. शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुक 2014, विधानसभा निवडणूक 2014, लोकसभा 2019 व सध्याची निवडणुक या काळात आचार संहिता भंग करणाऱयांवरही प्रतिबंधक कारवाई करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

त्यामध्ये लोकसभा निवडणुक 2014 मध्ये 13, विधानसभा निवडणुक 2014 मध्ये 44, लोकसभा 2019 मध्ये 36 व सध्याच्या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत 30 जणांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 28 गुन्हे दाखल असून त्यापैकी 8 गुह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहेत. तर एका गुह्यात न्यायालयात आरोपीविरुध्द दोष सिध्द झाला आहे. प्रतिबंधक कारवाई करुनही ज्या गुंडांमध्ये सुधारणा झालेली नाही, अशावर स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे काम सुरु आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2019 या काळात 9 जणांवर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 4 हातभट्टी व्यावसायिक तर 5 समाजकंटकांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेचा अंमल शहरात सुरु झाल्यापासून सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीत 60 वेळा वेगवेगळया ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये तडीपार तसेच फरारी व सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे अजामीनपात्र गुन्हा 433 वॉरंटची बजावणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर विमानतळावर आलेल्या दोन हेलिकॉप्टर व 10 विमानांची निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे.

21 सप्टेंबरपासून शहरातील 7 पोलीस ठाण्याच्या परिसरात 182 वेळा नाकाबंदी केली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी, वाहने तपासणे त्याचबरोबर अवैध दारु वाहतूक, पैसे व शस्त्रे केली जाते का, याबाबतची तपासणी करण्यात आली आहे. तिनही मतदार संघात 18 स्थिर सर्व्हेक्षण पथके कार्यान्वित आहेत. त्यामध्ये 54 कर्मचारी काम करत आहेत. निवडणुकीच्या बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी पोस्टल बॅलेटची सुविधा आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. त्यामध्ये 1 हजारपेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी यांना पोस्टल बॅलेट पुरविण्याचे काम आतापर्यंत झाले आहे. विधानसभेच्या तिनही मतदार संघात 53 संवेदनशील बुथ आहेत. अशा भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न म्हणून जास्तीत जास्त रुटमार्च करण्यात आले आहे. 

53 संवेदनशील बुथ

विधानसभा निवडणुकीत 3 मतदार संघात एकूण 53 संवेदनशील बुथ आढळून आले आहेत. या ठिकाणी खबरदारी म्हणून सीसीटीव्ही पॅमेरे लावण्यात येणार आहेत, त्याशिवाय प्रत्येक बुथवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.