|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोतील चौपदरी उड्डाण पुलाचे काम दोन महिन्यांपासून बंद

वास्कोतील चौपदरी उड्डाण पुलाचे काम दोन महिन्यांपासून बंद 

प्रतिनिधी/ वास्को

बायणा किनाऱयावरील गेली साडे चार वर्षे रखडणारे चौपदरी उड्डाण पुलाचे काम अखेर बंदच पडले आहे. मागच्या दोन महिन्यांपासून आर्थिक अडचणींमुळे हे काम बंद असून या पुलाच्या कामाचा प्रश्न आता अधिकच गंभीर बनलेला आहे.  रखडणाऱया कामामुळे धुळी प्रदुषणाची समस्याही भेडसावत आहे. वाहतुकीचा प्रश्नही जटील बनलेला आहे. बायणा किनाराही या पुलाच्या अर्धवट कामामुळे अडचणीत सापडलेला आहे. वास्कोतील या प्रश्नात आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

एकाच वेळी कामाला सुरवात होऊन मांडवीवरील तिसरा उड्डाण पुल सहा महिन्यांपूर्वी पूर्ण होऊन वाहतुकीसही खुला झाला. झुआरी नदीवरील दुसऱया पुलाचेही काम मोठय़ा प्रमाणात पूर्ण झालेले आहे. मात्र, वास्कोतील वरूणापुरी मांगोरहिल ते मुरगाव बंदर दरम्यानचा महामार्ग गेली साडे चार वर्षे रखडत आहे. कंत्राटदारांची बिले फेडलेली नाहीत, त्यामुळे या कामासाठी होणारा साहित्य पुरवठाही बंद झालेला आहे. अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्गाचेही वेतन थकलेले आहे. मागच्या सहा महिन्यांपासून ही आर्थिक चणचण निर्माण झालेली असून परीणामी मागच्या दोन महिन्यांपासून या महामार्गाचे काम बंदच पडलेले आहे. एकदाचा हा महामार्ग पूर्ण होतो व वास्कोतील वाहतुकीची जटील समस्या कधी एकदा हलकी होते याची प्रतीक्षा करीत राहिलेल्या लोकांना महामार्गाचे काम बंद पडल्याने धक्का बसलेला आहे.

आर्थिक अडचणींमुळे काम सुरू होण्याची चिन्हे नाहीत

 मांडवी व झुआरी नदीवरील प्रकल्प आणि वास्कोतील गांधीनगर ते मुरगाव बंदर दरम्यानचा तुलनेने कमी लांबीचा पुल जवळपास एकाच वेळी बांधकामाला घेण्यात आलेले होते. मात्र,  कमी लांबी असूनही वास्कोचा उड्डाण पुल गेली साडे चार वर्षे रखडत आहे. या रखडणाऱया कामामुळे येथील वाहतुकीची गंभीर अडचण दूर झालेली नाही. वाहतुकीतील अडचणी अधिकच वाढलेल्या आहेत. गांधीनगरच्या टेकडीवरून काटे बायणा ते रविंद्रभवनच्या जवळपास पुलाचे बहुतेक काम पूर्ण झालेले आहे. मात्र, किनाऱयासमोरील नाक्यावरच मागची अडिच वर्षे हा पुल रखडत आहे. त्याच प्रमाणे एमपीटीच्या रेल्वेयार्ड क्षेत्रात या उड्डाण पुलाचे काम रखडलेले आहे. रेल्वे यार्डातून हा पुल शहराला जवळ असलेल्या एमपीटीच्या पहिल्या धक्क्याला जोडला जाणार आहे. उड्डाण पुल बंदराला जोडला जाईपर्यंत आणखी दोन वर्षे खर्ची पडण्याची शक्यता  होती. मात्र, सध्या साहित्य पुरवठय़ाचे व मनुष्य बळाचे पैसेही फेडले जात नसल्याने हा प्रकल्प गंभीर अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे या  उड्डाण पुलाचे हे काम नक्की कधी पूर्ण होईल हे अवघड कोडे बनलेले आहे. चार दिवसांपूर्वी या महामार्गाच्या कामात गुंतलेल्या कंत्राटदारांनी, महामार्गाचे बांधकाम करणाऱया गॅमन इंडिया कंपनीच्या अधिकाऱयांनी, कर्मचारी व कामगारांनीही एकत्र येऊन आपल्या थकबाकीसाठी आंदोलन केले. अधिकाऱयांना धारेवर धरले. मात्र, अद्याप काम सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

धुळी प्रदुषणाची समस्या गंभीर

उड्ढाण पुलाच्या रखडणाऱया कामामुळे मागच्या साडे तीन वर्षांपासून रविंद्रभवन समोरच्या नाक्यावर धुळी प्रदुषणाचे साम्राज्य पसरलेले आहे. रविंद्रभवनला याचा बराच त्रास जाणवत आहे. देस्तेरो ते बायणापर्यंतच्या रस्त्यावर सध्या धुळी प्रदुषण प्रचंड माजलेले आहे. त्यामुळे सुरळीत वाहतुक जेरीस येत आहे. रविंद्रभवन आणि बायणा किनाऱयासमोर या चौपदरी उड्डाण पुलाचा नाका उभारला जात असून या नाक्याच्या कामामुळे या प्रदुषणाने धुळदाण उडवली होती. मात्र, सध्या काम बंद असल्याने या ठिकाणी ही समस्या थोडीशी हलकी झालेली आहे. धुळी प्रदुषण रोखण्यासाठीही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. धुळीच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये बरीच नाराजी दिसत आहे.

रखडणाऱया कामाचा बायणा किनाऱयावरही परीणाम

या उड्डाण पुलाचे बायणा किनाऱयावरील काम मागची साडेतीन वर्षे संपतच नसल्याने किनाऱयावरील मनोरंजन व लोकांच्या वर्दळीवर परीणाम झालेला आहे. धुळी प्रदुषण, उद्वस्त परीसर आणि इतर अडचणीही या ठिकाणी पुलाच्या कामामुळे निर्माण झालेल्या आहेत. पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय या समस्या दूर होणार नाहीत. त्यामुळे नागरिक या पुलाचे काम संपण्याची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, सध्या काम बंद पडल्याने बायणा किनाऱयाच्या अडचणीचा काळ अधिकच वाढणार आहे. किनाऱयाच्या सुशोभीकरणात उड्डाण पुलाचे रखडलेले काम व त्यामुळे या ठिकाणी निर्माण झालेली अवकळा एवढय़ात दूर होण्याची चिन्हे नाहीत.

रस्ता शहराला जोडण्यातही अडचणी

गोवा शिपयार्डमार्गे वास्को शहरात येणारी अवजड वाहतुक शहरा बाहेरून येणे आवश्यक असल्याने हा पुल शहरातील एखादय़ाला रस्त्याला जोडण्याचीही आवश्यकता आहे. अन्यथा चौपदरी उड्डाण पुल होऊनही शहरातील अवजड वाहतुकीची समस्या कायम राहणार आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी आय.ओ.सी. नाक्यावरून हा पुल शहरातील एफ. एल. गोम्स मार्गाला जोडण्याचे नियोजन महामार्ग प्राधिकरणाने केले होते. मात्र, ते धोक्याचे ठरण्याची शक्यता असल्याने वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा आणि मुरगाव पालिकेने रोखले होते. ही समस्या कशी सोडवली जाईल यावरही अद्याप निर्णय झालेला नाही. या महामार्गाच्या कामाने सध्या अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी महामार्गाच्या प्रश्नावर लक्ष घालण्याची गरज

साधारण अडिच मैल लांब असलेल्या या उड्डाण पुलाचे काम साडे चार वर्षे रखडत आहे. आता तर हे काम आर्थिक अडचणींमुळे बंदच पडल्याने यात राज्य सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे.  वास्को शहर व परीसराची सारी मदार वरूणापुरी ते मुरगाव बंदर दरम्यान होणाऱया या महामार्गावरच आहे. सध्या चिखलीपासून गोवा शिपयार्डकडून शहरात येणारा एकमेव मार्ग वास्कोवासियांसाठी असून या मार्गावर प्रचंड ताण पडत असल्याने वारंवार वाहतुक कोंडी व अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. अवजड वाहनांमुळे शहरात धोका निर्माण झालेला आहे. वरूणापुरी मांगोरहिल नाक्यापासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. तेथून गांधीनगरच्या टोकापर्यंत हा रस्ता अद्यापही कच्चा स्वरूपात आहे. या रस्त्यावरून सुरळीत वाहतुक होऊ शकत नाही. त्यामुळे या भागात राहणाऱया लोकांचे रस्त्याअभावी फारच हाल होत आहेत. किमान या रस्त्याचे तरी काम पूर्ण झाले असते तर तेथील लोकांना समाधान लाभले असते.

महामार्गाच्या प्रश्नावर सर्वसंबंधीतांची बैठक घेणार

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मुरगाव बंदराला जोडणाऱया महामार्गाचे काम बंद पडल्याच्या घटनेची आपण दखल घेतलेली असल्याचे सांगितले. या प्रश्नावर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरूणापुरी ते गांधीनगरपर्यंतचा रस्ता व पुढील बायणा ते मुरगाव बंदरपर्यंतचा उड्डाण पुल लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे होते. वास्कोतील वाहतुकीची फार मोठी समस्या त्यामुळे हलकी झाली असती. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, एमपीटी व गॅमन इंडिया कंपनीचे अधिकारी तसेच शासकीय अधिकाऱयांच्या समवेत महामार्गाचे बंद पडलेले काम व त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या परीस्थितीवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी आपण या आठवडय़ात बैठक घेणार असल्याचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी स्पष्ट केले.