|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फुटीरना काँग्रेसची दारे कायमची बंद

फुटीरना काँग्रेसची दारे कायमची बंद 

प्रतिनिधी/ पणजी

काँग्रेस पक्षाला दगा देऊन भाजपवासी झालेल्या 13 आमदारांना पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश दिला जाऊ नये, असा महत्त्वपूर्ण ठराव काल झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर या सर्व मतदारसंघामध्ये नवे चेहरे आणण्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जावे, अशी मागणीही करण्यात आली. सर्वानुमते संमत करण्यात आलेला ठराव लवकरच केंद्रीय काँग्रेस समितीला पाठविण्यात येणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येऊन भाजपवासी झालेल्या आमदाराबाबत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात असंतोष खदखदत होता. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसलेल्या या आमदारांना पुन्हा पक्षात घेतले जाऊ नये, असा सूर कार्यकर्ते व्यक्त करीत होते. अखेर काल झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत याचा स्फोट झाला व कार्यकारी समितीच्या बैठकीत तसा ठरावही सर्वानुमते संमत करण्यात आला. याअगोदर दक्षिण गोवा काँग्रेस समिती व उत्तर गोवा काँग्रेस समितीनेही अशा आशयाचे ठराव घेतले होते.

पक्षाचा व मतदारांचा विश्वासघात

माजी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदाराचा गट काँग्रेसमधून फुटला होता व त्याअगोदर तीन आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला होता. पक्षाचा व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा या 12 आमदारांनी विश्वासघात केला आहे. त्याचबरोबर मतदारांचाही या आमदारांनी विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश दिला जाऊ नये या सर्व फुटीर आमदारांना पक्षाची दारे कायमची बंद करावी, अशी मागणी या बैठकीत झाली. त्यानुसार ठराव मांडून त्याला सर्वानुमते संमती घेण्यात आली. हा ठराव लवकरच केंद्रीय काँग्रेस समितीला पाठविण्यात येणार आहे.

डिजिटल पद्धतीने सदस्य नोंदणी

देशभरात डिजिटल पद्धतीने ऍपबेज नवीन सदस्यनोंदणी काँग्रेसपक्ष करणार आहे. त्याचा पायलट प्रकल्प गोव्यात सुरु होणार आहे. मतदारसंघात आता ऍपद्वारे सदस्यनोंदणी केली जाणार आहे. घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी केली जाणार आहे. त्यावरही चर्चा करण्यात आली. तीस मतदारसंघामध्ये उमेदवार निवडीबाबतही तयारी होणार आहे. दोन्ही जिल्हा समित्यांनाही सूचना केली आहे. सदस्य नोंदणीवेळी याबाबत चर्चा होणार आहे. पुढील दोन वर्षांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पक्षबांधणी करण्यासाठी सदस्य नोंदणीचा फायदा होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात दोन, तीन चेहरे निवडले जातील. त्याचबरोबर संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे.

दिल्लीतही झाली होती चर्चा

याअगोदर पक्षाला सोडचिठ्ठी देऊन गेलेल्या फुटीरांबाबत याअगोदर दिल्लीतही चर्चा झाली होती. पक्षाशी गद्दारी केलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. त्यासाठी या मतदारसंघामध्ये नव्याने पक्ष बांधणी करून नवीन चेहरे पुढे आणण्याची सूचनाही केंद्रीय काँग्रेस नेत्यांनी केली होती. पक्षाचा विश्वासघात ज्यांनी केला ते पक्षाच्या उमेदवारीवर दोन, तीन किंवा चारवेळा निवडून आले आहेत. या आमदारांना यानंतर जनताही स्विकारणार नाही. त्यामुळे या मतदारसंघामध्ये नवीन चेहऱयांना संधी देण्याची तयारी करा, अशी सूचनाही केंद्रीय काँग्रेस नेत्यांनी केली होती. काल झालेली बैठक प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. या बैठकीत माजी केंद्रीयमंत्री एदुआर्द फालेरो, माजी खासदार रमाकांत आंगले, धर्मा चोडणकर, आग्नेल फर्नांडिस यांनीही विचार मांडले.