|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » विविधा » व्यसनाकडे समाजाने अपराध म्हणून पाहण्याऐवजी आजार म्हणून पहावे

व्यसनाकडे समाजाने अपराध म्हणून पाहण्याऐवजी आजार म्हणून पहावे 

पुणे  / प्रतिनिधी : 
व्यसनाधीनता ही एक गुहा असून तिथे केवळ आत जाणा-यांची पाऊले दिसतात, पण परत येणा-यांची पाऊले दिसत नाहीत. यास व्यसनाधीन व्यक्तीबरोबर समाजही तितकाच कारणीभूत आहे. व्यसनाकडे समाजाने अपराध म्हणून पाहण्याऐवजी आजार म्हणून पाहिल्यास ही परतीची पाऊले देखील उमटतील, असा आशावाद संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केला. राजहंस प्रकाशनातर्फे मिलिंद दिवाकर लिखित ‘पालवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार राजीव खांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद बोरसे, ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर, लायन डिस्ट्रीक्टचे गव्हर्नर आणि पालवी संस्थेचे आधारस्तंभ अभय शास्त्री, लेखक मिलिंद दिवाकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
डॉ. मोरे म्हणाले की, व्यसनाधीनता हा प्रश्न केवळ त्या व्यसनाधीन व्यक्तीपुरता किंवा त्याच्या कुटुंबापुरता मर्यादित नसून त्याकडे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने देखील पाहिले पाहिजे. कारण या व्यसनाचा उपसर्ग सगळ्यांनाच होत असतो. व्यसनाधीनतेबाबत समाजाला व्यापक भान येणे आवश्यक असून लेखक मिलिंद दिवाकर यांच्या पालवी या संस्थेच्या माध्यमातून हे कार्य सक्षमपणे केले जात आहे. आज प्रकाशित झालेले पुस्तक हे  स्वतः व्यसनाच्या आहारी गेलेल्या आणि त्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीनेे लिहिले असल्याने ते एक अनुभव संपन्न लिखाण आहे. समाजात अनेकदा मनुष्यप्राणी आपण जसे आहोत, ते लपवण्याचा आणि जसे नाही आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
व्यसनाधीनता ही मानसिक आरोग्याशी निगडीत बाब असून व्यसनांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्म नक्कीच उपयोगी ठरू शकते. व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबिय आणि मित्र मंडळी हात देऊ शकतात, मदत करू शकतात. परंतु, त्यातून बाहेर पडणे हे सर्वस्वी त्या व्यसनाधीन व्यक्तीवरच अवलंबून असते. 

Related posts: