|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » भर पावसात मतदान कर्मचारी रवाना

भर पावसात मतदान कर्मचारी रवाना 

उत्तर-दक्षिणमध्ये मतदानाची तयारी पूर्ण

वार्ताहर/ कराड

आज होणाऱया सातारा लोकसभा पोटनिवडणूक व कराड दक्षिण, उत्तर विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान साहित्य व बंदोबस्त रविवारी रवाना करण्यात आला. कराड उत्तरसाठी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल तर दक्षिणसाठी शासकीय धान्य गोदामातून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. सोमवारी 21 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत मतदान प्रक्रिया होणार असून मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे.

 कराड तालुक्यात कराड दक्षिण व उत्तर असे दोन मतदार संघ आहेत. कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल भोसले व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यात चुरशीची लढत होत असून संपूर्ण राज्याचे लक्ष कराड दक्षिणच्या लढतीकडे लागले आहे. त्यादृष्टीने निवडणूक प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. मतदान अधिकारी व कर्मचाऱयांसह प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या शिवाय 5 भरारी पथके, 3 स्थिर पथके. 10 व्हिडीओ सर्वेक्षण पथक व 2 व्हिडीओ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

    कराड उत्तर मतदारसंघात कराडसह सातारा, कोरेगाव व खटाव या चार तालुक्यातील गावे येतात. उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील, धेर्यशील कदम व मनोज घोरपडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. उत्तरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मतदान साहित्य, अधिकारी, कर्मचारी व पोलीस बंदोबस्तासह 7 भरारी पथके, 4 स्थिर पथके, 10 व्हिडीओ सर्वेक्षण पथके व 2 व्हिडीओ पाहणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. रविवारी नेमलेल्या मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी निवडणूक कर्मचारी व वाहनांची गर्दी झाली होती. त्यातच सकाळपासून पाऊस असल्याने निवडणूक कर्मचाऱयांना पावसाचा त्रास सहन करावा लागला.

Related posts: