|Friday, December 6, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताची सलामी लंकेविरुद्ध

भारताची सलामी लंकेविरुद्ध 

यू-19 विश्वचषक स्पर्धा कार्यक्रम जाहीर

वृत्तसंस्था/ दुबई

दक्षिण आफ्रिकेत होणाऱया 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम आयसीसीने जाहीर केला असून विद्यमान विजेत्या भारताची सलामीची लढत लंकेविरुद्ध 19 जानेवारी रोजी होणार आहे. ब्लोमफौंटेनमध्ये ही लढत होणार आहे.

युवा भारतीय संघाने ही स्पर्धा चार वेळा जिंकली असून आगामी स्पर्धेत भारताच्या अ गटात न्यूझीलंड, लंका व नवोदित जपान या संघांचा समावेश आहे. पुढील वर्षी 17 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार असून 16 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारताच्या पुढील लढती जपान व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध अनुक्रमे 21 व 24 जानेवारी रोजी होतील. मागील वेळचा उपविजेता व तीन वेळा जेतेपद मिळविलेल्या ऑस्ट्रेलियाचा ब गटात समावेश असून याच गटात विंडीज, इंग्लंड व पदार्पण करणाऱया नायजेरिया या संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची सलामीची लढत विंडीजविरुद्ध होणार आहे. गट क मध्ये पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे व स्कॉटलंड यांचा समावेश आहे.  यजमान दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 17 जानेवारी रोजी होईल. गट ड मध्ये त्यांचा समावेश असून संयुक्त अरब अमिरात व कॅनडा हे या गटातील इतर संघ आहेत.

या स्पर्धेची ही 13 वी आवृत्ती असून यावेळी दुसऱया टप्प्यात सुपर लीग व प्लेट असे दोन विभाग असतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर लीग विभागात खेळतील तर उर्वरित सर्व संघांत प्लेट चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात येईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. सुपर लीग उपांत्यपूर्व व दोन उपांत्य सामने आणि अंतिम लढत पोश्चेफस्ट्रूममधील जेबी मार्क्स ओव्हलवर खेळविली जाणार आहे.

मागील वेळी न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेतील पूर्ण सदस्य असलेले अव्वल 11 संघ आणि पाच विभागीय चॅम्पियन्स, ज्यांनी या स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे, या संघांचे 12 ते 15 जानेवारी या कालावधीत सराव सामने होणार आहे. हे सामने जोहान्सबर्ग व प्रिटोरिया येथे खेळविले जातील. या स्पर्धेसाठी करण्यात आलेली गटवारी पुढीलप्रमाणे आहे.

गट अ : भारत, न्यूझीलंड, लंका व जपान.

गटा ब : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, विंडीज व नायजेरिया

गट क : पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलंड

गट ड : अफगाणिस्तान, द.आफ्रिका, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा.

 

Related posts: