|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आंबेनळी घाटात एसटी बस कोसळली

आंबेनळी घाटात एसटी बस कोसळली 

प्रतिनिधी /खेड :

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील पायटेनजीक बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास अक्कलकोट-महाड एस.टी. बस 30 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ही बस आंब्याच्या झाडाजवळ अडकल्याने प्रवासी बालंबाल बचावले. अपघात बसचालकासह 21 प्रवासी जखमी झाले असून यातील दोन वृद्ध महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. एस.टी. बसचालकास समोरून येणाऱया वाहनाने हूल दिल्याने नियंत्रण सुटून हा अपघात घडला.

जखमींमध्ये बसचालक एन. पी. खरात, स्नेहा आदेश गायकवाड (महाड), जनाबाई परशुराम पंडित (पुणे), गीता मिठ्ठा (सोलापूर), सुषमा गायकवाड, बाबाजी बर्गे  (महाड), शिल्पा संदीप रिंगे, संदीप श्रीराम रिंगे (लहूळसे), संतोष रामू साने (आड), सादिका खलील गैबी (राजेवाडी-महाड), अवधूत गोपीचंद दुबे (सांगली), कलम मनोज वाघे, मनोज काळूराम वाघे (वाई), तेजस शिवाजी आढाव (फलटण), सूरज रावजी जाधव (सातारा), प्रसाद मिठ्ठा निरजा (सोलापूर), महम्मद शेख काझी, राहुल गेणू पवार (सातारा), पृथ्वीराज अवधून अहिरे (सांगली), एस.टी. वाहक बहाद्दूर रामसिंग दुबे (लातूर) यांचा समावेश आहे.

 यातील जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृद्ध महिलेची प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारार्थ महाड येथे हलवण्यात आले. बसचालक एन. पी. खरात एमएच- 14, बीटी- 3226 या क्रमांकाची अक्कलकोट-महाड बस घेऊन येत होते. आंबेनळी घाटातील पायटेनजीक बस आली असता अचानक बस 30 फूट दरीत कोसळून एका आंब्याच्या झाडाजवळ जाऊन लटकली.

बस दरीत कोसळल्याचे वृत्त कर्णोपकर्णी सर्वत्र पसरताच प्रशासनासह ग्रामस्थांचा थरकाप उडाला. प्रशासनासह मदतकर्ते तसेच स्वयंसेवी संस्था मदतकार्यासाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बस दरीत कोसळल्यानंतर बसमधील प्रवाशांनी मदतीसाठी आक्रोश केला. हाच आक्रोश ऐकून भोर येथून शाळेतील मुलांना सोडून परत येणाऱया पोलादपूर येथील वैभव शंकर मपारा या जीपचालकाने सोबतच्या प्रवाशांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना कमरेतील बेल्टच्या सहाय्याने बाहेर काढण्याची मौलिक कामगिरी केली.

Related posts: