|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » राहुल गुप्त मोहिमेवर गेले आहेत का?

राहुल गुप्त मोहिमेवर गेले आहेत का? 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विदेश दौऱयांबद्दल भाजपने गुरुवारी खोचक टिप्पणी केली आहे. राहुल हे 5 वर्षांमध्ये 16 वेळा विदेश दौऱयावर गेले आहेत. राहुल हे यापूर्वीच्या अमेठी या स्वतःच्या लोकसभा मतदारसंघातही एवढय़ा वेळा गेलेले नाहीत. याच कारणामुळे अमेठीच्या जनतेने त्यांना नाकारल्याची खोचक टिप्पणी भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी केली आहे.

राहुल 16 वेळा विदेश दौऱयावर गेले असून यातील 9 वेळा ते नेमके कुठे गेलेत हेच सांगण्यात आलेले नाही. राहुल कुठल्या गुप्त मोहिमेत सामील आहेत का अशी उपरोधिक विचारणा राव यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

राहुल गांधी यांच्याकडे सरदार पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही वेळ नसणे अत्यंत दुर्देवी आहे आणि ही आश्चर्याची बाब निश्चित नाही. यापूर्वीही नेहरू-गांधी परिवाराने भारत निर्माणमध्ये योगदान देणाऱया अनेकांचा तिरस्कार केल्याचा दावा भाजप नेते अमित मालवीय यांनी केला आहे.

राहुल गांधी हे ऑक्टोबर महिन्यात दुसऱयांदा विदेश दौऱयावर गेले आहेत. राहुल गांधी वेळोवेळी ध्यानधारणेसाठी विदेशात जात असतात असे स्पष्टीकरण काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिले आहे. केंद्र सरकारविरोधी निदर्शनांची रुपरेषा राहुल यांच्या निर्देशानुसार तयार करण्यात आल्याचा दावाही सुरजेवाला यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष आर्थिक संकटाच्या मुद्यावरून सरकारच्या विरोधात व्यापक निदर्शनांची तयारी करत आहे. 1 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत काँग्रेस 35 पत्रकार परिषदांचे आयोजन करणार आहे.

 

Related posts: