‘मैं नायक ही ठिक हुँ’ : ‘नायक’ अनिल कपूर

ऑनलाइन टीम / मुंबई :
विधनसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आक्रमक आहे. तसेच, सत्तेत समान वाटा मिळावा, यासाठी भाजपावर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच सोशल मीडियावर देखील मुख्यमंत्रिपदाचीच चर्चा रंगली आहे. नेटिझन्सनी यावर एक भन्नाट पर्याय सुचवला आहे.
’नायक’ या लोकप्रिय हिंदी चित्रपटात अनिल कपुर हे एक दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते. दोन पक्ष मुख्यमंत्रिपदाबाबत जोपर्यंत निर्णय घेत आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अभिनेता अनिल कपुर नियुक्ती करा असं नेटिझन्सनी म्हटलं आहे. तसेच युजर्सने आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील ते टॅग केलं आहे.
युजर्सचं हे मुख्यमंत्रिपदाबाबतचं ट्विट अनेकांनी रिट्विट केलं आहे. तर काहींनी हा पर्याय आवडल्याचं देखील सांगितलं आहे. नेटिझन्सच्या या मागणीला अभिनेते अनिल कपूर यांनी देखील भन्नाट उत्तर दिलं आहे. ‘मैं नायक ही ठिक हुँ’ असं अनिल कपूर यांनी म्हटलं आहे. अनिल कपूर यांनी दिलेल्या या उत्तराचं सर्वत्र कौतुक होत आहे. नायक या चित्रपटात अनिल कपूर यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. समाजात बदल घडवणारी अनेक कामं ते एका दिवसात करतात.