|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अर्धवट विकासकामाचा आणखी एक बळी

अर्धवट विकासकामाचा आणखी एक बळी 

प्रतिनिधी/ बेळगाव

मंडोळी रोडच्या विकासाचे काम अर्धवट राहिले असून याठिकाणी गटारी बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडून द्वारकानगर येथील रहिवाशाचा  मृत्यू झाला. स्मार्ट रोडचे काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने दुसरा बळी गेला असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.

द्वारकानगर सहावा क्रॉस येथील रहिवासी दौलत मल्हारी दावले-गवळी (वय-65) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते प्रकाश थिएटरमध्ये काम करीत होते. रात्री अकरा वाजता काम आटोपून सायकलवरून ते घरी जात असत. शुक्रवारी रात्री बारा वाजले तरी दौलत हे घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलांनी प्रकाश थिएटरमध्ये संपर्क साधून चौकशी केली. पण तेथून ते निघाले असल्याचे सांगण्यात आल्याने शोधाशोध करण्यात आली. रात्री दोन वाजले तरी त्यांचा पत्ता लागला नसल्याने ते हरवल्याची तक्रार टिळकवाडी पोलीस स्थानकात देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची मुले घरी परतत असताना  राहत्या घरापासून शंभर मीटरवर मुख्य रस्त्याशेजारील खड्डय़ाजवळ दौलत यांचे स्वेटर आणि बूट निदर्शनास आले. यामुळे खड्डय़ामध्ये वाकून पाहिले असता दौलत दावले-गवळी पडल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या डोक्मयाला जबर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लागलीच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दीड तासापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरनी सांगितले. स्मार्ट सिटीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात सायकलवरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. या परिसरात पथदीप नाहीत तसेच शुक्रवारी पाऊस होता. त्यामुळे समोरील खड्डा निदर्शनास आला नसल्याने दुर्दैवी घटना घडली. याबाबत नातेवाईकांनी टिळकवाडी पोलीसस्थानकात कंत्राटदार आणि स्मार्ट सिटी कंपनीविरोधात तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दौलत दावले-गवळी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सोमवार दि. 4 रोजी सकाळी 8 वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.

अशोकनगर येथेही स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून गेल्या काही दिवसांपूर्वी याच मार्गावर स्कूटरवरून पडून दीपलक्ष्मी सोमदत्त नाईक (वय 31 रा. अशोकनगर) यांचा मृत्यू झाला होता. 

Related posts: