|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कारची-दुचाकीला धडक, महिला जागीच ठार

कारची-दुचाकीला धडक, महिला जागीच ठार 

प्रतिनिधी/ निपाणी

कारची दुचाकीला धडक बसल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना निपाणी-चिकोडी मार्गावर रामपूर क्रॉसनजीक शनिवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. सर्विना उर्फ डॉली गंगाधर शितोळे (वय 25 रा. पांगिरे-ए) असे मृत महिलेचे नाव आहे. तर दुचाकीस्वार गंगाधर युवराज शितोळे (वय 28) व अर्नव किरण शितोळे (वय 4 दोघेही रा. पांगिरे-ए) हे दोघेजण गंभीर जखमी झाले.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, दुचाकी क्र. (केए 23 एन 7114) ही पांगिरे-ए हून निपाणीकडे येत होती. त्याचदरम्यान कार क्र. (केए 48 एम 5214) ही चिकोडीहून कोल्हापूरकडे जात होती. दरम्यान 9.30 च्या सुमारास रामपूर क्रॉसनजीक कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यात सर्विना या जागीच ठार झाल्या. दुचाकीस्वार गंगाधर व अर्नव हे दोघेजण गंभीर जखमी झाले. तर प्राची किरण शितोळे (वय 7) ही किरकोळ जखमी झाली.

जखमींना त्वरित महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंगाधर व अर्नव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना त्वरित सिटी हॉस्पीटल कोल्हापूर येथे 108 रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. अपघातानंतर कारचालक श्रीनिवास मनोहर निप्पाणे यांनी घटनास्थळावरुन कार तसेच पुढे नेली. हे नागरिकांच्या लक्षात येताच निपाणी बसस्थानकातील छ.संभाजी चौक येथे त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कारमध्ये दोघेजण प्रवास करीत होते.

घटनेची माहिती मिळताच बसवेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. जी. सुब्बापूरमठ, साहाय्यक उपनिरीक्षक एस. एस. जाधव, हवालदार एस. एस. सनदी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सर्विना यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. सर्विना या निपाणीतील एका ज्वेलर्समध्ये कामाला होत्या. त्यांच्या निधनाने पांगिरे-ए गावावर शोककळा पसरली आहे.

Related posts: