|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा » बांगलादेशचा भारतावर पहिला विजय

बांगलादेशचा भारतावर पहिला विजय 

पहिल्या टी-20 सामन्यात 7 गडय़ांनी मात, सामनावीर रहीमचे नाबाद अर्धशतक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सामनावीर मुश्फिकुर रहीमने नाबाद अर्धशतक झळकावल्याने बांगलादेशने पहिल्या टी-20 सामन्यात बलाढय़ भारताचा 7 गडय़ांनी पराभव केला. बांगलादेशने टी-20 क्रिकेटमध्ये भारतावर मिळविलेला हा पहिलाच विजय आहे. या मालिकेतील दुसरा सामना राजकोट येथे गुरुवारी खेळविला जाणार आहे.

खेळपट्टीत धोकादायक असे काहीच नसताना देखील एकाही भारतीय फलंदाजाला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठी खेळी करता आली नाही आणि निर्धारित 20 षटकांत त्यांना 6 बाद 148 धावांच जमविता आल्या. शिखर धवनने सर्वाधिक 41 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशनने 19.3 षटकांत 3 गडय़ांच्या मोबदल्यात 154 धावा जमवित भारतावरील पहिला टी-20 विजय साकारला. दूषित हवामानात यजमान भारतापेक्षा बांगलादेशने खेळपट्टीचा चांगला वापर केला. भारतीय फलंदाजांनी अतिसावध खेळ केल्याने प्रेक्षकांचीही निराशा झाली.

रहीम ठरला विजयाचा शिल्पकार

शेवटच्या 12 चेंडूत बांगलोदशला 22 धावांची गरज असताना रहीमने 19 व्या षटकांत चार चेंडूत चार चौकार ठोकत बांगलादेशचा विजय सोपा केला. त्याने व सौम्या सरकारने (39) तिसऱया गडय़ासाठी 60 धावांची भागीदारी करून संघाला विजयासमीप आणले होते. खलीलने सरकारला त्रिफळाचीत केल्यानंतर रहीमला कृणाल पंडय़ाने चहलच्या गोलंदाजीवर जीवदान दिले. त्यावेळी रहीम 38 धावांवर खेळत होता. प्रारंभी लिटन दास (7) लवकर बाद झाला. पण नवोदित मोहम्मद नईम (26) व अनुभवी सरकार यांनी दुसऱया गडय़ासाठी 46 धावांची भर घालून  भारताला चिंतेत टाकले होते. चहलने वैविध्यपूर्ण मारा करीत दोघांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो यशस्वी ठरला नाही. नईमने चहलवर हल्ला केला. पण त्याच्याच गोलंदाजीवर ता बादही झाला. आक्रमक फटकेबाजी करण्याऐवजी चेंडू गॅपमध्ये ढकलून धावा जमविण्याचे धोरण बांगलादेशने अवलंबले होते. रहीम दहाव्या षटकात बाद झाला होता. पण पंचांनी चहलचे पायचीतचे अपील फेटाळून लावले. त्याचा पुरेपूर लाभ रहीमने उठविला. रहीमने 43 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह नाबाद 60 धावा फटकावल्या.

भारताचा धावांसाठी संघर्ष

फिरोज शहा कोटलाच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारतीय फलंदाज अखेरपर्यंत झगडतानाच दिसून आले. कर्णधार रोहित शर्माने 2 चौकार मारत चांगली सुरुवात केली. पण केवळ 9 धावांवर तो बाद झाला. आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा शिखर धवनही संथ फलंदाजी करताना दिसला. त्याने 42 चेंडूत 41 धावा जमविल्या. पुनरागमन केल्यापासून धवनला सूर गवसण्यासाठी संघर्षच करावा लागला आहे. त्याने या सामन्यात भारतातर्फे सर्वाधिक धावा जमविल्या असल्या तरी त्यासाठी त्याने तब्बल 7 षटके घेतली. तो धावचीत झाल्यानंतर भारताच्या धावगतीला आणखी ब्रेक लागला.

युवा ब्रिगेडकडून बऱयाच अपेक्षा केल्या जात होत्या. पण श्रेयस अय्यरचा अपवाद वगळता इतरांना बांगलादेशच्या गोलंदाजांवर हल्ला करणे जमले नाही. अय्यरने 13 चेंडूत 22 धावा तडकावल्यामुळे धावगतीला थोडासा वेग आला. पदार्पणवीर शिवम दुबेला केवळ एक धाव करता आली तर ऋषभ पंतने 26 चेंडूत 27 धावा जमविल्या. वॉशिंग्टन सुंदर व कृणाल पंडय़ा यांनी अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी केल्यामुळेच भारताला दीडशेच्या जवळपास मजल मारता आली. सुंदरने 5 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 14 तर कृणालने 8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 15 धावा फटकावल्या. बांगलादेशतर्फे वेगवान गोलंदाज शफिउल इस्लाम व स्पिनर अमिनुल इस्लाम यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.

भारतीय कर्णधार 99 व्या टी-20 सामन्यात खेळताना शफिउलच्या पहिल्याच चेंडूला ग्लान्सचा चौकार मारून सुरुवात केली. याच षटकात त्याने कव्हर ड्राईव्हचा चौकार मारून भारताला फ्लाईंग स्टार्ट करून दिली. पण इस्लामने पाचव्या चेंडूवर त्याला पायचीत करून माघारी पाठवले. केएल राहुल व धवन यांना मुक्तपणे फटकेबाजी करणे जमत नव्हते. धवनला तर पहिला चौकार मारण्यासाठी 13 चेंडू प्रतीक्षा करावी लागली. राहुलने 17 चेंडू खेळून 15 धावा जमविल्या आणि अमिनुल इस्लामने त्याला बाद केले.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केलेल्या अय्यरने पहिल्या चेंडूपासून आक्रमण सुरू करीत अमिनुल इस्लामला उत्तुंग षटकार ठोकला. तो उत्तुंग फटके मारण्याचाच प्रयत्न करीत होता. इस्लामला त्याने आणखी एक षटकारासाठी पिटाळले. अमिनुलला त्याने हल्ल्यासाठी निवडले होते. पण त्यानेच त्याची खेळी संपुष्टात आणली. पदार्पणवीर मोहम्मद नईमने त्याचा सीमारेषेनजीक झेल टिपला. अफिफ हुसेनने एक बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकांत 6 बाद 148 : रोहित शर्मा 5 चेंडूत 9, धवन 41 (42 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), राहुल 15 (17 चेंडूत 2 चौकार), अय्यर 22 (13 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), पंत 27 (26 चेंडूत 3 चौकार), दुबे 1, कृणाल पंडय़ा नाबाद 15 (8 च्sंडूत 1 चौकार, 1 षटकार), वॉशिंग्टन सुंदर नाबाद 14 (5 चेंडूत 2 षटकार), अवांतर 4. गोलंदाजी : शफिउल इस्लाम 2-36, अमिनुल इस्लाम 2-22, अफिफ हुसेन 1-11).

बांगलादेश 19.3 षटकांत 3 बाद 154 : लिटन दास 7, मोहम्मद नईम 26 (28 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), सौम्या सरकार 39 (35 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), मुश्फिकुर रहीम नाबाद 60 (43 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), मेहमुदुल्ला नाबाद 15 (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 7. गोलंदाजी : चहर 1-24, खलील अहमद 1-37, यजुवेंद्र चहल 1-24.

Related posts: