|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चाकरमान्यांची परतीची वाट

चाकरमान्यांची परतीची वाट 

सातारा बसस्थानक गजबजले, आगार व्यवस्थापनाकडून गैरसोय,

प्रतिनिधी/ सातारा

दिवाळीच्या सणाला मुंबई, पुण्याहून चाकरमानी गावी आले होते. आता दिवाळीच्या सुट्टय़ा संपत आल्याने व सोमवारपासून कामावर रुजू होण्याकरता रविवारी सकाळपासूनच सातारा बसस्थानकात चाकरमान्यांची तोबा गर्दी दिसत होती. सातारा आगाराकडून नेहमीप्रमाणे गैरसोय होताना दिसत होती. प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. ऑनलाईन बुकींगचा फज्जा उडाला होता. वेळेची बस तास तासभर थांबूनही मिळत नव्हती, अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली.

दिवाळीनिमित्ताने गावी आलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. एसटीचा प्रवास सुखी प्रवास ही वाक्य आता ठेवणीतली वाटू लागली आहेत. सातारा आगारामध्ये एक ना धड भाराभर चिंध्या असा कारभार सुरु आहे. महामंडळाचेच अधिकारी आहे की अन्य कोणत्या खाजगी कंपनीचे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरुन प्रवाशांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सातारा आगारात पुणे, मुंबईला जाण्याकरता बुकींग सेंटर आहेत. त्या सेंटरवर सगळाचा सावळा गोंधळ असतो. अधिकारीही आपला कोण असेल तरच सांभाळून घेतात. नाहीतर विरोधात बोंबाबोंब करतात. शिवशाहीच्या नावाने तर खडे फोडण्याचेच सत्र सुरु आहे. मुळात प्रवाशांना एसटीने कोणती बस द्यायची हे ठरवायचे असते. सध्या ऑनलाईनचा जमाना असल्याने अनेक प्रवाशी हे मोबाईलवरुनच ऑनलाईन बसची बुकींग करतात. परंतु सातारा आगारात विचारणा करण्याची सोय नसते. सदर प्रवाशी आणि संबंधित बुकींग करणारे कर्मचारी यांच्यामध्ये वादावादीच्या घटना घडू लागल्या आहेत. बुकींग करणाऱया वाहकास थोडे आगावु पैसे दिले की लगेच चांगली सिट देतो, असा अनुभव अनेक प्रवाशांनी बोलून दाखवला आहे. तास अन् तास रांगेत उभे राहूनही बस मिळत नाही. असा सातारा आगाराचा तुघलकी कारभार सध्या सुरु आहे. नियोजनाचा अभाव असल्याने एसटी स्थानकाला यात्रेचे स्वरूप आले आहे. दरम्यान, स्थानकातील अधिकाऱयांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सातारा आगारामधून रोज मुंबई पुणे बोरिवली या ठिकाणी नॉन स्टॉप बसेस सुरू केल्या आहेत. सातारा आगार व जिह्यातील इतर आगारामधून जादा बसेस बोलावण्यात आल्या आहेत. विभागीय नियंत्रक सागर पाळसुले यांनी स्वतः लक्ष घातले आहे. 60 ते 70 बसेसचे नियोजन करून या तीनही मार्गावर सोडल्या जात आहेत. पुणे नॉनस्टॉपसाठी जादा 30 बसेस, मुंबईसाठी जादा 15 बसेस बोरिवलासाठी जादा 15 बसेसची सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांना जादा वेळ रांगेत उभे राहायला लागू नये म्हणून जादा तिकीट काउंटर ही उघडले आहे. आगार प्रमुख श्रीमती सय्यद याही प्रवाशांची गैरसोय होवू नये याकरता धावपळ करत असल्याचेही सांगण्यात आले.

 

Related posts: