|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून 

वार्ताहर/कराड

येवती (ता. कराड) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱहाडीचा घाव घालून तिचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांची 14 वर्षीय मुलगी सोनालीच्या समोरच हा प्रकार घडल्याने ती घाबरली होती. रेखा विनोद कांबळे (वय 35) असे मयत विवाहितेचे नाव असून या प्रकरणी तिचा पती विनोद रामचंद्र कांबळे (रा. येवती) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मयत रेखा कांबळे यांचा भाऊ संदीप शहाजी थोरात (रा. वाकुर्डे बुद्रुक, ता. शिराळा) यांनी तालुका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळे हा वारंवार दारू पिऊन पत्नी रेखा कांबळे यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यापूर्वीही त्याने अनेकदा याच कारणावरून रेखा कांबळे यांना दारू पिऊन मारहाणही केली होती. याबाबत सहा महिन्यांपूर्वी उंडाळे पोलीस दूरक्षेत्रात तक्रारही दिलेली होती. तरीही मात्र विनोद कांबळे वारंवार मारहाण करीत असल्याबाबत बहीण रेखा कांबळे यांनी फोन करून व प्रत्यक्ष भेटून भावाला सांगितले होते.

शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मुलगा रोहित हा शेजारी चुलत्यांच्या घरात होता तर मुलगी सोनाली घरीच होती. यावेळी विनोद कांबळे याने चारित्र्याचा संशय घेऊन घरातील कुऱहाड घेऊन पत्नी रेखा कांबळे यांच्या डोक्यात घाव घातला. यावेळी आरडाओरडा झाल्याने मुलगा रोहित पळत घरी आला. यानंतर नातेवाईकांनी रेखा कांबळे यांना उपचारासाठी सहय़ाद्री रूग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळातच रेखा कांबळे यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

 या घटनेमुळे येवती परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर मयत रेखा कांबळे यांचा पती विनोद रामचंद्र कांबळे याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सहय़ाद्री रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय परिसरात गर्दी केली होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर करीत आहेत.

Related posts: