|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खंबाटकी घाटात विचित्र अपघात, 7 वाहनांचा चक्काचूर

खंबाटकी घाटात विचित्र अपघात, 7 वाहनांचा चक्काचूर 

प्रतिनिधी/ खंडाळा

आशियाई महामार्गावरील बेंगरुटवाडीजवळ एस कॉर्नरला कंटेनर पलटी झाला होता. तो कंटेनर बाजुला काढण्याचे काम सुरू होते. यावेळी भरधाव येणाऱया ट्रकने पुढे थांबलेल्या वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहतूक पोलीस सुनिल शेलार (वय 50) हे मालट्रक व कारच्यामध्ये अडकून गंभीर जखमी झाले. यात 7-8 कारचा चक्काचूर झाला. दोन वेगळय़ा अपघातामध्ये पोलीस शेलार यांच्यासह कंटेनरमधील दोघे जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले.

  या अपघाताबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महामार्गावर   बेंगरुटवाडीजवळ एस कॉर्नरवर रविवारी सकाळी सातच्या सुमारास कंटेनर क्र. MH O6 AQ 8923 च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला. हा रस्त्यात असलेला कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळित करण्यासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवली होती. यावेळी मार्गावर खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार ठाकरे, पोलीस तुषार कुंभार, सहाय्यक फौजदार विजय जाधव, बालाजी वडगावे, सतीश सुबे, नवनाथ पवळे, सुनिल शेलार तेथे कार्यरत होते. कंटेनर महामार्गावरुन हटवताना अनेक कार थांबल्या होत्या.

  दरम्यान, ट्रकचालक गंगाधर एस. हिरेमठ (वय-26 ,रा. नादनबावी जि. धारवाड ) हे पुण्याच्या दिशेनी निघाले होते. उताराहून जात असताना त्यास वाहतूक पोलीस थांबण्याचा इशारा देत होते. मात्र पाठीमागून भरधाव वेगात ट्रक KA 26 6447 ने पुढे थांबलेल्या वाहनांना चिरडले. मालट्रक व कारच्यामध्ये हवालदार सुनिल विठ्ठल शेलार हे चिरडले. या अपघातात हवालदार शेलार यांचा उजवा पाय मोडला.

  या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड, पी.एस.आय. एस.एन. पवार, पोलीस संजय धुमाळ, विठ्ठल पवार, प्रशांत धुमाळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार शेलार यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तर दोन वेगळय़ा अपघातातील हवालदार शेलार यांच्यासह कंटेनरचा चालक हणमंत रामचंद्र शिंदे (वय 25) रा .जत (सांगली), क्लिनर सागर अरुण पाटील (वय 19) रा. आळेगांव जि. सोलापूर हे गंभीर जखमी झाले. त्या जखमींना खंडाळ्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गगदर्शनाखाली तुषार कुंभार अधिक तपास करित आहेत.   

एस. कॉर्नरवर कधी सरळ होणार

खंबाटकी घाटातील बेंगरुटवाडी जवळचा एस. कॉर्नर प्रवाशांसाठी काळ ठरला आहे. आजपर्यंत याठिकाणी शेकडो अपघात झाली असून कित्येकजणांचा बळी गेला आहे. गतवर्षी विजापूरहून आलेल्या 18 मजुरांचा मृत्यू याच ठिकाणी झाला होता. यानंतरही एस. कॉर्नर व हायवे ऍथोरिटीविरोधात आवाज उठवला. याप्रसंगी एस. वळण काढले जाईल, असे आश्वासन प्रशासनामार्फत देण्यात आले. मात्र अद्याप याबाबत काहीही हालचाल झाली नसून दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Related posts: