कार्तिकी एकादशीसाठी एसटीच्या 1,300 जादा बसेस

6 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान एसटी महामंडळाची जादा बसेसची सुविधा
मुंबई / प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे 8 नोव्हेंबर रोजी भरणाऱया कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीने महाराष्ट्रातील विविध बसस्थानकावरून सुमारे 1,300 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. 6 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही जादा वाहतूक करण्यात येईल. याशिवाय आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आलेले आहेत.
कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱया संपूर्ण महाराष्ट्रतील भाविक प्रवाशांची सोय करण्याच्या हेतूने दरवर्षीप्रमाणे एसटीने यंदाही 1,300 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. या यात्रेला विशेषत: कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या विभागातून भाविक प्रवाशांची जास्त गर्दी होते. यास्तव या 5 विभागातून मुंबई-110, रायगडö100, सिंधुदुर्ग-30, ठाणेö30, रत्नागिरी-120 विशेष जादा बसेस सोडण्यात येत आहेत. पंढरपूर येथे स्थानिक बसस्थानकांबरोबरच चंद्रभागा नगर येथे विभागनिहाय तात्पुरत्या बसस्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक प्रवाशांनी या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.