|Monday, January 27, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘फस्तेशिकस्त’ला शिवकालीन संगीताचा साज

‘फस्तेशिकस्त’ला शिवकालीन संगीताचा साज 

ऑनलाईन टीम / पुणे :

सुमधूर संगीत ही भारतीय सिनेमांची खासियत मानली जाते. मराठी सिनेसृष्टीमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून आजच्या डिजीटल युगापर्यंतची फार मोठी संगीतमय परंपरा मराठीला लाभली आहे. कथेला अनुसरून गीत-संगीताची किनार जोडली जाणं हा त्यातील महत्त्वाचा पैलू मानला जातो. त्यामुळेच ‘फत्तेशिकस्त’ हा आगामी महत्त्वाकांक्षी सिनेमाही शिवकालीन संगीताचा साज लेऊन सजल्याचं सिनेरसिकांसोबतच संगीतप्रेमींनाही अनुभवायला मिळणार आहे.

लेखन-दिग्दर्शनासोबतच ‘फत्तेशिकस्त’मध्ये आपल्या अभिनयाची झलकही दाखविणाऱया दिग्पाल लांजेकरनं ‘फत्तेशिकस्त’च्या माध्यमातून रसिकांसाठी जणू संगीताचा नजराणाच पेश केला असून, संगीतकार देवदत्त मनिषा बाजी यांच्या दृष्टीतून तो प्रभावीपणे सादर झाला आहे.

‘रणी फडकती लाखो झेंडे’… हे एक भव्य दिव्य गाणं ‘फत्तेशिकस्त’मधील गाणं प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेल्या या गाण्यात 200 नर्तक, मावळातील 1000 कार्यकर्ते, 200 ढोलवादक आणि 200 ध्वजधारकांचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला आहे. कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी या गाण्याचं अप्रतिम नृत्य दिग्दर्शन केलं आहे. ‘रणी फडकती…’ची आणखी एक खासियत म्हणजे हे गाणं सिनेमातील सर्व कलाकारांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. फत्तेशिकस्तमधील तुंबडी रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात शाहिरी सादर करणारे अज्ञान दास यांचे 17 वे वंशज असलेल्या हरिदास शिंदे यांनी ही तुंबडी गायली आहे. त्यामुळे ‘फत्तेशिकस्त’मधील या तुंबडीला कळत-नकळत शिवकालीन वारसा लाभला आहे.

‘स्वराज्यातील पहिला सर्जिकल स्ट्राईक’ असं वर्णन केला जाणाऱया ’फत्तेशिकस्त’चं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरनं केलं आहे. ए. ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेला ‘फत्तेशिकस्त’ 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके या मराठमोळय़ा कलाकारांनी या सिनेमात विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अनुप सोनी हा हिंदीतला प्रसिद्ध चेहरा ‘फत्तेशिकस्त’मध्ये शाहिस्ता खान साकारत मराठीकडे वळला आहे.

Related posts: